तीन वर्षांनंतर साधणार स्मार्ट आरसी वाटपाचा मुहूर्त, कंपनीकडून टेस्टिंग पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 04:41 PM2018-01-15T16:41:19+5:302018-01-15T16:46:12+5:30
प्रादेशिक परिवहन कार्यालयातून तब्बल तीन वर्षांनंतर स्मार्ट आरसीचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. या आठवड्यात स्मार्ट आरसीचा मुहूर्त साधण्यात येणार असून, त्यासाठी अर्जदाराकडून २०० रुपये शुल्क आकारला जाणार आहे.
प्रदीप भाकरे
अमरावती : येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातून तब्बल तीन वर्षांनंतर स्मार्ट आरसीचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. या आठवड्यात स्मार्ट आरसीचा मुहूर्त साधण्यात येणार असून, त्यासाठी अर्जदाराकडून २०० रुपये शुल्क आकारला जाणार आहे.
आरटीओ अमरावती विभागांतर्गत येणा-या यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून स्मार्ट आरसीचे वितरण सुरू झाले असून अमरावतीसह बुलडाणा, वाशिम येथील स्टेटिंग झाल्यावर याच आठवड्यात वितरणाला सुरुवात होईल. खासगी वाहनांचे स्मार्ट आरसी पोस्टद्वारे पाठविण्यात येणार आहेत, तर परिवहन संवर्गातील वाहनांचे स्मार्ट आरसी आरटीओमध्येच वितरित केले जाईल.
परिवहन विभागाने रोझ मार्टा कंपनीशी केलेला करार संपुष्टात आल्यानंतर डिसेंबर २०१४ पासून वाहनधारकांना परस्पर आरसी दिली जात होती. मध्यंतरी आरसी छपाईसाठी कागद उपलब्ध होत नसल्यास साध्या कागदावर आरसी देण्यात येत होती. तो कागद अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने स्मार्टकार्ड देण्याची मागणी होती. त्या पार्श्वभूमीवर एप्रिल २०१७ मध्ये रोझ मार्टा या कंपनीलाच स्मार्ट आरसीचे कंत्राट देण्यात आले.
मात्र, तांत्रिक अडचणींमुळे नोव्हेंबर २०१७ मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आरटीओ कार्यालयात रोझ मार्टाने कामास सुरुवात केली. पश्चिम विदर्भात स्मार्ट आरसीसाठी या कंपनीला जानेवारी उजाडला आहे. वाहनधारकांकडून आकारण्यात येणा-या २०० रुपयांमधून ५४ रुपये रोझ मार्टाला देण्यात येणार आहेत. उर्वरित रक्कम सरकारी महसुलात जमा होईल.
यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत स्मार्ट आरसीचे वितरण सुरू केले आहे. अमरावतीतही टेस्टिंग पूर्ण झाली असून, या आठवड्यात येथूनही स्मार्टकार्ड आरसी देण्यात येईल.
- विजय काठोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती