मोदींपासून वाचण्यासाठी साप, मुंगूस, कुत्रे एकत्र; अमित शहांचे टीकास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 05:44 AM2018-04-07T05:44:39+5:302018-04-07T05:44:39+5:30
नरेंद्र मोदी नावाच्या महापुरापासून वाचण्यासाठी सगळे विरोधक एकत्र आले आहेत. महापूर आला की सगळी खुरटी झाडंझुडपं मोडून पडतात. केवळ वटवृक्ष राहतो आणि पुराला घाबरलेले साप, मुंगूस, कुत्रे, मांजरी त्या वृक्षावर बचावासाठी चढतात.
- विशेष प्रतिनिधी
मुंबई - नरेंद्र मोदी नावाच्या महापुरापासून वाचण्यासाठी सगळे विरोधक एकत्र आले आहेत. महापूर आला की सगळी खुरटी झाडंझुडपं मोडून पडतात. केवळ वटवृक्ष राहतो आणि पुराला घाबरलेले साप, मुंगूस, कुत्रे, मांजरी त्या वृक्षावर बचावासाठी चढतात. मोदीविरोधकांची आज तशीच अवस्था झाली आहे, अशी घणाघाती टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली.
भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी बीकेसी ग्राऊंडवर आयोजित महामेळाव्यात शहा बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, सुरेश प्रभू, हंसराज अहीर, डॉ. सुभाष भामरे, भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्ष खा.पूनम महाजन, विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील भाजपचे सर्व मंत्री तसेच नेते व हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
अमित शहा म्हणाले की, राहुल गांधी हे भाजपच्या सरकारकडे साडेचार वर्षाचा हिशेब मागत आहेत. पण त्यांच्या चार पिढ्यांनी देशासाठी काय केले, याचा हिशेब आता जनताच त्यांना विचारत आहे. राहुलबाबा हल्ली शरद पवारांनी इंजेक्शन दिल्यानंतर मोदी सरकारबद्दल बोलतात.
आरक्षण रद्द होणार असल्याची हूल उठवून दिली जात आहे, पण राज्यघटनेने मागासवर्गीयांना दिलेले आरक्षण कधीही रद्द होऊ दिले जाणार नाही, असे शहा यांनी ठणकावून सांगितले.
केंद्रातील मोदी व महाराष्ट्रातील फडणवीस सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप लावला जाऊ शकत नाही, असे सांगून ते म्हणाले की, मोदींसारखा जगातील लोकप्रिय नेता आमच्याकडे आहे. खोट्या आश्वासनांवर नाही तर केंद्र व राज्य सरकारच्या दमदार कामगिरीवर आम्हाला पुन्हा यश मिळवायचे आहे. वैचारिक मतभेद असलेले पक्ष आज केवळ आमच्या विरोधात एकत्र येत आहेत. आज आम्ही २० राज्यांत सत्तेत आहोत. पण पश्चिम बंगाल, ओरिसात सत्ता येईल, तेव्हाच यशाचे वर्तुळ पूर्ण होईल. देशाच्या विविध प्रश्नांवर चर्चा नको असलेले विरोधक संसद बंद पाडत आहेत. त्यांनी चर्चेचे ठिकाण निवडावे; आम्ही चर्चेला तयार आहोत, असे आव्हान त्यांनी दिले. मात्र अमित शहा यांनी आपल्या भाषणात कर्नाटक निवडणुकीचा उल्लेख टाळला.
राणे अनुपस्थित!
भाजपाच्या तिकिटावर नुकतेच राज्यसभेवर निवडून गेलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे या महामेळाव्याकडे फिरकलेच नाही. नारायण राणेंची अनुपस्थिती आणि स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थकांनी केलेली घोषणाबाजी याचीच चर्चा सभामंडपात होती.
अमित शहांनी दिले सेनेशी युतीचे संकेत
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाच्याच नेतृत्वात एनडीएचे सरकार येईल, असा विश्वास व्यक्त करत भाजपा शिवसेनेशी युती करणार असल्याचे संकेत शहा यांनी दिले. नंतर पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी शिवसेना आमचा मित्र पक्ष राहावी हीच आमची इच्छा असल्याचे सांगितले. बहुमतात असूनही आम्ही केंद्र वा राज्यांमध्ये मित्र पक्षांची साथ सोडलेली नाही, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करून तसे संकेत दिले.
सत्तेसाठी हपापलेले लांडगे
उद्या दंगली घडवतील
सत्तेच्या आशेने सगळे लांडगे आज एकत्र येत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. आमच्याकडे मोदींसारखा सिंह आहे. हे लांडगे आमचे काहीही वाकडे करू शकणार नाहीत. सत्तेसाठी हपापलेले हे लांडगे उद्या जात, धर्माच्या नावाने दंगली घडवतील, तुमचा बुद्धिभेद करतील, असेही त्यांनी बोलून दाखवले.