मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरेंची अजमेर शरीफ दर्ग्याला भेट? जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 08:22 AM2019-10-29T08:22:19+5:302019-10-29T08:29:20+5:30
आदित्य ठाकरेंचा फोटो सोशल मीडिया व्हायरल
मुंबई: विधानसभेच्या निकालानंतर चार दिवस गेले तरीही अद्याप महायुतीला सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला निश्चित करता आलेला नाही. सत्तेचं समसमान वाटप व्हावं यासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेकडून भाजपाची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर शिवसेनेचे आमदार संपर्कात असल्याचा दावा करून भाजपानं खळबळ उडवून दिली आहे.
शिवसेना आणि भाजपा दबावाचं राजकारण करत असताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे चर्चेत आले आहेत. ठाकरे यांचा पगडीतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न साकार व्हावं यासाठी आदित्य ठाकरेंनी अजमेर शरीफ दर्ग्याला भेट देऊन मन्नत मागितली, अशा मजकूरासह आदित्य यांचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
गौरव प्रधान नावाच्या व्यक्तीनं आदित्य यांचा एक फोटो ट्विटरवर अपलोड केला आहे. 'मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसेनेचा राहुल गांधी आज अजमेर शरीफ दर्ग्याला पोहोचला,' असा मजकूर या फोटोसह ट्विट करण्यात आला आहे. तीन हजारहून अधिक लोकांनी हे ट्विट लाईक केलं असून एक हजारहून अधिक लोकांनी रिट्विट केलं आहे. ट्विटरसोबतच फेसबुकवरदेखील हा फोटो चर्चेत आहे.
Bala Saheb died again today
— #GauravPradhan 🇮🇳 (@DrGPradhan) October 26, 2019
Well done @ShivSenapic.twitter.com/wriJtBzCZc
या फोटोची सत्यता शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. तेव्हा हा फोटो चार महिने जुना असल्याची माहिती समोर आली. जून महिन्यात आदित्य ठाकरेंनी ख्याजा मोईनुद्दीन चिश्तींच्या दर्ग्याला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी दर्ग्यावर चादर चढवली होती. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं चांगली कामगिरी केल्यानंतर आदित्य यांनी दर्ग्याला भेट दिली होती. यासोबतच त्यांनी ठाकरे कुटुंबाची कुलदेवी एकविरा देवीचं आणि अंबाबाईचं दर्शन घेतलं होतं.