ऐश्वर्या हत्याकांडामध्ये सोहेलचा सहभाग उघड
By admin | Published: September 8, 2016 02:20 AM2016-09-08T02:20:55+5:302016-09-08T02:20:55+5:30
प्रेमसंबंध तोडू पाहणाऱ्या ऐश्वर्यावर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्याची सुपारी तिच्या प्रियकरानेच दिल्याचे पोलीस तपासात उजडात आले आहे.
वसई : प्रेमसंबंध तोडू पाहणाऱ्या ऐश्वर्यावर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्याची सुपारी तिच्या प्रियकरानेच दिल्याचे पोलीस तपासात उजडात आले आहे. यात बलात्काराचा प्रयत्न असफल झाला असला तरी दीपकने ऐश्वर्याची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी सोहेल आणि दीपकला अटक केली आहे. मात्र, या प्रकरणात सोहेलला सोडून देणाऱ्या पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी बहुजन विकास आघाडीने केलीआहे.
विरारच्या विवा महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या ऐश्वर्या अग्रवाल (१९) या तरुणीची शुक्रवारी तिच्या प्रियकराचा मित्र दीपक वाघरी (२८) याने कुऱ्हाडीचे सतरा वार करून आपल्या घरात निर्घृण हत्या घडवून आणली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.
पोलिसांनी या प्रकरणात हत्या करणारा वाघरी आणि ऐश्वर्याचा प्रियकर सोहेल शेख याला अटक केली आहे. सोहेलनेचे ऐश्वर्याची हत्या घडवून आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
ऐश्वर्या आणि सोहेल यांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून ती सोहेलला टाळत होती. त्यामुळे ऐश्वर्याची हत्या करण्याचे त्याने ठरवले. हत्येची सुपारी त्याने आपला मित्र दिपक वाघरी याला दिली होती. ऐश्वर्याला दिपकच्या घरी भेटायला बोलवून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करायची असा कट असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जर्नादन परबकर यांनी दिली.
ऐश्वर्या टाळू लागल्याने सोहेल त्रस्त झाला होता. त्यामुळे संतापलेल्या सोहेलने आपला मित्र दीपक वाघरी याच्याशी संगनमत करून ऐश्वर्याची हत्या करण्याचा कट रचला होता. शुक्रवारी दुपारी सोहेलेने ऐश्वर्याला ठरलेल्या योजनेनुसार विरार येथील दीपकच्या घरी बोलावले. यावेळी सोहेल बाजूला लपून बसला होता. दिपकने ऐश्वर्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ऐश्वर्याने विरोध केल्याने दिपकचा प्रयत्न फसला. त्यामुळे त्याने ठरलेल्या योजनेनुसार ऐश्वर्याची कुऱ्हाडीने
वार करून हत्या केली. यानंतर
सोहेल घटनास्थळी पोहोचला आणि दीपकने हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले.
हत्या घडल्यानंतर पोलिसांनी दीपक एकट्याला दोषी ठरवत त्याला अटक केली होती. तर सोहेलला सोडून दिले होते. ऐश्वर्याच्या पालकांनी सोहेलही यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. तसेच रात्री विरारमध्ये सोहेलला अटक करावी यासाठी कँडल मार्च काढण्यात आला होता. वाढता दबाव पाहून पोलिसांनी सोहेलला अटक केली. त्यानंतर पोलीस तपासात सोहेलने हत्येची सुपारी दिल्याची कबुली देऊन हत्याकांडाच्या तपासाला वेगळेच वळण दिले. (प्रतिनिधी)