शुभवार्ता! सर्वसामान्यांना लवकरच मिळणार लोकलने प्रवास करण्याची मुभा; राजेश टोपेंनी दिले महत्वाचे संकेत
By मुकेश चव्हाण | Published: October 10, 2020 09:07 PM2020-10-10T21:07:54+5:302020-10-10T21:16:23+5:30
राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू सर्व गोष्टी उघडण्यास परवागनी देण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात मागील काही दिवसांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे. राज्यात शनिवारी २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी झाले, तर आतापर्यंत १२ लाख ५५ हजार ७७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याचदरम्यान राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अशातचं आता नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
अनलॉक 5 अंतर्गत राज्यातील सुमारे चार लाख रेस्टॉरंट, हॉटेल आणि बार पुन्हा सुरु झाले आहेत. त्यामुळे राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा करूया, असं विधान राजेश टोपे यांनी केले आहे. राजेश टोपे यांच्या या विधानातून लॉकडाऊनला जवळपास पूर्णविराम मिळू शकतो, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे अहमदनगरमध्ये आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू सर्व गोष्टी उघडण्यास परवागनी देण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यात रेल्वे देखील सुरु करण्यात आली आहे. लवकरचं सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालय सुरु करण्याचा विचार असल्याचे राजेश टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.७६ टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या राज्यात २ लाख २१ हजार १५६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात शनिवारी ११ हजार ४१६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ३०८ मृत्यू झाले आहेत. परिणामी, राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने १५ लाख १७ हजार ४३४ टप्पा गाठला असून कोरोना बळींची एकूण संख्या ४० हजार ४० वर पोहोचली आहे. सध्या राज्यात २२ लाख ६८ हजार ५७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २४ हजार ९९४ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
राज्याचा मृत्यूदर २.६४ टक्के असून दिवसभरात नोंद झालेल्या ३०८ मृत्यूंमध्ये मुंबई ४८, ठाणे २, ठाणे मनपा ६, नवी मुंबई मनपा ६, भिवंडी निजामपूर मनपा १, मीरा भाईंदर मनपा १, वसई विरार मनपा ४, रायगड १, पनवेल मनपा ६, नाशिक ८, नाशिक मनपा ८, अहमदनगर १८, अहमदनगर मनपा ६, धुळे मनपा १, जळगाव ५, जळगाव मनपा १, पुणे २२, पुणे मनपा १६, पिंपरी चिंचवड मनपा ८, सोलापूर २२, सातारा २६, कोल्हापूर १, सांगली ७, सांगली मिरज कुपवाड मनपा ३, सिंधुदुर्ग २, रत्नागिरी ४, औरंगाबाद २, औरंगाबाद मनपा २, जालना १, लातूर २, लातूर मनपा ३, उस्मानाबाद ७, बीड ८, नांदेड मनपा २, अकोला मनपा १, अमरावती ४, अमरावती मनपा २, यवतमाळ २, वाशिम ४, नागपूर ५, नागपूर मनपा १३, वर्धा १, भंडारा ४, गोंदिया ३, चंद्रपूर ३, चंद्रपूर मनपा ४ या रुग्णांचा समावेश आहे.