कोल्हापूर : येत्या काही दिवसांत रखडलेल्या तलाठी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांच्या पदोन्नत्या मार्गी लावणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. कोल्हापूर ‘लोकमत’च्या सोमवारी होणाऱ्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी शनिवारी शहर कार्यालयास सदिच्छा भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला.पाटील म्हणाले, सध्या महसूलमधील पदोन्नत्या रखडल्या आहेत. त्यामुळे एका तालुक्यात तीन ते चार तहसीलदारांची पदे रिक्त आहेत. तलाठ्यांमधून १० टक्के नायब तहसीलदार, नायब तहसीलदारांमधून १० टक्के तहसीलदार आणि तहसीलदारांमधून ५० टक्के उपजिल्हाधिकारी अशा या पदोन्नत्या झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये महसूल विभागाला चांगले मनुष्यबळ मिळेल.पदोन्नतीनंतर हे अधिकारी बदलणार असल्याने पुन्हा आयोगाला नव्याने काम करावे लागणार आहे; परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयुक्तांशी चर्चा करून यातून मार्ग काढल्याचेही पाटील यांनी सांगितले.मराठा आरक्षण, युतीबाबत आशावादीमराठा समाजासाठी आम्ही आतापर्यंत आखल्या नाहीत अशा योजना केल्या आणि त्याची अंमलजबावणी सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर आम्ही काम करीत आहोत. यातूनच टिकणारे आरक्षण देऊ. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकींमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती पुन्हा होईल, असेही पाटील म्हणाले.महाराष्ट्रात लोकसभेसोबत विधानसभा नाहीसंपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची चर्चा सुरू असली तरी महाराष्ट्रामध्ये या दोन्ही निवडणुका एकत्र होणार नाहीत, असेही यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
महसूलमधील रखडलेल्या पदोन्नत्या लवकरच- चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:45 PM