बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सर्वांशी किती सहजतेने संवाद साधतात हे येथील एका कार्यक्रमात पाहायला मिळाले. शरद पवार यांच्या हजरजबाबीपणाचे किस्सेही सर्वांनी ऐकले आहेत. येथील एका कार्यक्रमात शरद पवार आणि बालगायिकेचा संवाद चांगलाच रंगला. या वेळी सातारा प्रचारसभेचा संदर्भ घेऊन बालिकेने विचारलेल्या प्रश्नाला मिश्किलपणे उत्तर देताना पावसात भिजत भाषण केल्याने मला मतदारांनी आणखी मते दिली, असे सांगितले. या उत्तरावर श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाटाने दाद दिली.
दरवर्षी दिवाळीत बारामतीकरांना सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेता यावा या उद्देशाने पवार सार्वजनिक न्यासाच्या वतीने शारदोत्सवाचे आयोजन केले जाते. शनिवारी रात्री या कार्यक्रमात सहभागी एका बालगायिकेने शरद पवार यांनाच थेट काही प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली. त्याला पवार यांनी तत्काळ संमती दिली. ही चिमुरडी पवार यांना काय प्रश्न विचारणार आणि ते काय उत्तर देणार याची सर्वांनाच उत्सुकता होती.
मला कविता करता येतात पण तुम्ही इतकी छान भाषणं कशी काय देता?, या तिच्या प्रश्नावर पवार हसत हसत म्हणाले, मी भाषण करू शकतो, पण कविता काही करू शकत नाही. इथं तुझी आणि माझी परिस्थिती सारखीच आहे, या उत्तरावर उपस्थितांमध्ये जोरदार हसा पिकला.
मग बालगायिकेने दुसरा प्रश्न त्यांच्या सातारा येथील गाजलेल्या भाषणावरच विचारला. सुरुवातीला तिने लडीवाळपणे, कधी कधी पाऊस येतो, पण मी जेव्हा पावसात भिजायला जाते, तेव्हा माझे आजोबा मला खूप रागावतात, अशी आजोबांविषयी तक्रार करीत प्रश्न विचारला. ती म्हणाली, तुम्ही इतक्या जोरदार पावसात कसे काय भाषण दिले? या प्रश्नावर सभागृहात हशा पिकला. त्यावर पवार यांनी हजरजबाबीपणे उत्तर दिले. ते म्हणाले, तुझे आजोबा तुला पावसात भिजल्यावर रागावतात. मात्र, मी पावसात भिजून भाषण केल्याने माझ्या मतदारांनी मला आणखी मते दिली. या उत्तरावर सभागृहात टाळ्यांचा पाऊस पडला.