मुंबई : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सोपे होणार आहे. राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांना दिव्यांगाच्या वर्गवारीनुसार आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालये, विद्यापीठे यांची राहणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थ्यांची वर्गवारी ठरवण्यात आली आहे. त्यानुसार दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार, सोयी-सुविधा दिल्या जाणार आहेत. अंध विद्यार्थ्यांसाठी गणितातील पाटी (मॅथेमॅटिक स्लेट), आवाजाचे गणकयंत्र (टॉकिंग कॅल्क्युलेटर), ग्लास मॅग्नीफायर वापरायची परवानगी देण्यात आली आहे. काही दिव्यांग विद्यार्थी थकल्यास मधेच लेखनिक उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली आहे. तर, काही वर्गवारीमध्ये अशा विद्यार्थ्यांना सुरक्षित वाटावे त्यांना खात्री वाटेल अशी व्यक्ती परीक्षा वर्गाजवळ उपस्थित राहू शकणार आहे. तर, सेरेबल पाल्सी, बहुविकलांग, लोकोमीटर डिसेबिलिटी इत्यादी वर्गवारीतील विद्यार्थी हे जास्त दाब देऊन लिहितात त्यासाठी त्यांना जाड पानांची उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले. (प्रतिनिधी)
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा - तावडे
By admin | Published: March 06, 2017 5:49 AM