नाशिक: नाशिकहून मुंबईकडे रात्रीच्या सुमारास इनोव्हा कारमधून निघालेले विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या कारला शहापूर येथील पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या कारसह वाहनांचा चक्काचूर झाला असून मिसर हे सुदैवाने बचावले. सोबत असलेल्या सुरक्षारक्षकांनादेखील गंभीर मार लागला नसल्याचे मिसर यांनी लोकमत'शी बोलताना सांगितले. या भीषण अपघातात बसमधील 3 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
शुक्रवारी उच्च न्यायालयात होणाऱ्या एका खटल्याच्या सुनावणीसाठी मिसर यांना हजर राहायचे होते. त्यामुळे नाशिक येथून मिसर हे त्यांच्या खासगी ईनोवा कारमधून (एम.एच15 डी एम 3937) मुंबईच्या दिशेने रात्री दहा वाजेच्या सुमारास सुरक्षारक्षक यांना घेऊन मार्गस्त झाले.
शहापूर पुलावर मुंबईकडून नाशिकच्या दिशेने भरधाव जाणारी महामंडळाची शिवशाही बस दुभाजक तोडून विरुद्ध बाजूला मुंबई लेनवर येऊन उलटली. त्यामुळे या लेनवरून मार्गस्त होत असलेला कंटेनर त्या बसवर जाऊन आदळला आणि या दोन्ही वाहनांचा अचानक अपघात झाल्यामुळे मिसर यांच्या कारच्या चालकाचेही नियंत्रण सुटले. मात्र त्याने शेवटपर्यंत प्रयत्न करत कारचा वेग आटोक्यात आणला. तरीही कार कंटेनर आणि पुलाच्या कठड्याच्या मध्ये जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये मिसर यांच्या कारसह कंटेनरचा चक्काचूर झाला. दैव बलवत्तर असल्याने या भीषण अपघातातून मिसर व त्यांचे सुरक्षारक्षक आणि कारचालक थोडक्यात बचावले. त्यांना किरकोळ स्वरूपाचा मार लागला आहे. मिसर यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी कारमधील सर्व सहकारी व ते स्वतः या दुर्घटनेत सुखरूप असल्याचे सांगितले. रात्री 11 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडल्याचे त्यांनी सांगितले.
"आम्ही सगळे सुखरूप आहोत, कोणालाही गंभीर मार लागलेला नाही, त्यामुळे कोणीही काळजी करु नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नये, आम्ही सगळे पुन्हा नाशिकच्या दिशेने माघारी परतत आहोत" - अजय मिसर, विशेष सरकारी वकील, नाशिक