मुंबई : पुण्यातील कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ सोहळ्यानिमित्य बंदोबस्तासाठी गेल्यावर्षी भाड्याने घेतलेल्या एसटी बसचे भाडे चुकते करण्यासाठी अखेर गृह विभागाला सवड झालेली आहे. पोलिसांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या बसचे २४ लाख ६५ हजाराचे भाडे वर्षभरापासून थकीत होते. त्याबाबतच्या पाठपुराव्यामुळे गृह विभागाने मंगळवारी त्याला हिरवा कंदील दाखविला आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याबाबतचा प्रस्ताव महासंचालक कार्यालयामार्फत गृह विभागाकडे पाठविला होता. त्यानुसार संबंधित रक्कम एसटी महामंडळाकडे तातडीने वर्ग करण्याची सूचना करण्यात आलेली आहे.एक जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या अनुयायावर भीषण दगडफेक करण्यात आली होती. देशभरात त्याचे पडसाद उमटून जातीय दंगलीमध्ये शेकडो कोटीची हानी झाली होती. त्यामुळे गेल्यावर्षीच्या आभिवादन सोहळ्यावेळी कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती उदभवू नये, यासाठी राज्यभरातून विशेष पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. त्यानुसार वाहतुकीसाठी महामंडळाच्या बसेस वापरल्या होत्या. त्यासाठी एकुण २४ लाख ६७ हजार २९४ रुपये भाडे झाले होते.
गेल्यावर्षी ३ सप्टेंबरला पुणे ग्रामीणचे अधीक्षक संदीप पाटील यांनी त्याबाबतचा प्रस्ताव कोल्हापूर विशेष महानिरीक्षक यांच्याकडे पाठविला होता. तेथून तो मुख्यालयात पाठविण्यात येवून तेथून गृह विभागाकडे सादर करण्यात आला होता.