शिवशाहीमुळे एसटी महामंडळाची झाली दिवाळी....
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 08:38 PM2018-11-13T20:38:30+5:302018-11-13T20:42:55+5:30
शिवशाहीला मिळालेली पसंती तसेच जादा गाड्यांच्या नियोजनामुळे यंदा प्रवासी संख्येत वाढ झाल्याने उत्पन्नही वाढले आहे.
पुणे : दिवाळीत दरवर्षी खासगी ट्रॅव्हल्सला पसंती देणाऱ्या अनेक प्रवाशांची पावले यंदा एस.टी. महामंडळाच्या शिवशाहीकडे वळाली. त्यामुळे शिवशाहीमुळे एसटीची दिवाळी झाल्याचे चित्र आहे. एसटीच्या पुणे विभागाचे संचलन कमी होऊनही यावर्षी उत्पन्नात जवळपास ४१ लाखांहून अधिक वाढ झाली आहे. शिवशाहीने खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर दिल्याने त्यांच्या व्यवसायावरही परिणाम झाल्याचे ट्रॅव्हल व्यावसायिकांनी मान्य केले.
दिवाळीनिमित्त एसटीकडून दरवर्षी जादा बसचे नियोजन केले जाते. यावर्षी पुणे विभागाने नियमित बसव्यतिरिक्त जवळपास ४५० जादा बस सोडल्या. यावर्षी नियमित बससह जादा बसमध्ये आरामदायी वातानुकुलित शिवशाही बसचा समावेशही होता. मागील वर्षी या बस महामंडळामध्ये दाखल झाल्या असल्या तरी दिवाळीमध्ये कर्मचाऱ्यांच्या संपामुळे संचलन होऊ शकले नाही. त्यानंतर यंदा दिवाळीपर्यंत दिवसेंदिवस शिवशाहीची मागणी वाढत गेली. दिवाळीतही खुप चांगला प्रतिसाद मिळाला. पुणे विभागाला दि. १ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत सुमारे ७ कोटी ५२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामध्ये शिवशाहीतून मिळालेल्या उत्पन्नाचा वाटा १ कोटींहून अधिक आहे. पुणे विभागात ८५ शिवशाही बस असून त्यामध्ये ८३ बस आसनी तर दोन बस शयनयान आहेत.
२०१६ मध्ये दिवाळीच्या काळात पुणे विभागाला ७ कोटी १० लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. त्यामध्ये यंदा सुमारे ४२ लाख रुपयांची भर पडली आहे. विशेष म्हणजे यावर्षी २०१६ च्या तुलनेत बसची एकुण धाव कमी झाली आहे. २०१६ मध्ये विभागातील बसचे एकुण किलोमीटर २१ लाख ३९ हजार एवढे होते. यावर्षी त्यामध्ये १ कोटी ६४ लाखांनी घट झाली. असे असूनही विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. शिवशाहीला मिळालेली पसंती तसेच जादा गाड्यांच्या नियोजनामुळे यंदा प्रवासी संख्येत वाढ झाल्याने उत्पन्नही वाढले आहे. दि. ६ नोव्हेंबरनंतरही एसटीला मोठी गर्दी आहे. त्यामुळे एकुण दिवाळीच्या उत्पन्नात आणखी वाढ होणार आहे. तसेच यावर्षी पहिल्यांदाच मार्गावरील विविध थांब्यांपासूनही आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यालाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला, असे अधिकाºयांनी सांगितले.
---------------
पुणे विभागाचे दि. १ ते ६ नोव्हेंबर या कालावधीतील उत्पन्न -
वर्ष उत्पन्न एकुण धाव (किलोमीटर)
२०१६ ७ कोटी १० लाख १९ लाख ७५ हजार
२०१८ ७ कोटी ५२ लाख २१ लाख ३९ हजार