ठाणे : इंटक संघटनेच्यावतीने १७ डिसेंबर २०१५ रोजी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदविरोधात एसटी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून बंदमुळे झालेले नुकसान कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वसूल करण्याची सुरुवात केली आहे. याविरोधात इंटकने आक्र मक पवित्रा घेत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा २०१२-१६ हा कामगार करार रद्द करून २५ टक्के पगारवाढ करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य एसटी इंटक संघटनेने हा बंद पुकारला होता. एसटीच्या ६० लाख प्रवाशांपैकी या बंदचा राज्यातील १० ते १५ लाख प्रवाशांना फटका बसला. प्रवाशांच्या गैरसोयीबरोबरच एसटीचेही नुकसान झाले. कर्मचाऱ्यांनी बेकायदा संप पुकारून एसटीचे नुकसान केल्याचा ठपका संपातील कर्मचाऱ्यांवर ठेवून झालेले नुकसान त्यांच्या पगारातून भरून घेतले जात आहे. काही विभागांत एसटी प्रशासनाने कारवाई करीत कर्मचाऱ्यांच्या पगारातून ५ ते ८ दिवसांचा पगार कापण्यास सुरुवात केली आहे. याबाबत, दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती इंटकचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी दिली आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी आणि प्रशासन यांच्यातील वाद अधिकच पेटण्याची शक्यता आहे. १७ डिसेंबर रोजी इंटक संघटनेच्या वतीने राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला होता. राज्यातील २५० पैकी ७० डेपोंमध्ये या बंदला प्रतिसाद मिळाला होता. कर्मचाऱ्यांची गळचेपी, न्याय, हक्कासाठी आंदोलन करणे हे लोकशाही व्यवस्थेने प्रत्येक नागरिकाला दिलेले हत्यार आहे.आपल्या हक्कासाठी लढणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. दोन दिवसांत सकारात्मक निर्णय न घेतल्यास याविरोधात तीव्र आंदोेलन केले जाईल.- जयप्रकाश छाजेड, अध्यक्ष, इंटक एसटी संघटना
एसटी कर्मचारी-प्रशासन वाद चिघळणार?
By admin | Published: January 04, 2016 2:45 AM