मुंबई - एसटी महामंडळाने १ जानेवारीपासून ऑनलाईन आरक्षण प्रणाली अदयावत करुन नव्याने सुरु केलेल्या तिकीट आरक्षण प्रणालीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. १ जानेवारी ते २० मे पर्यंत १२ लाख ९२ हजार तिकीटाची विक्री नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून झाली आहे. याच काळात मागील वर्षी ९ लाख ७५ हजार तिकीटांची विक्री झाली होती. मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या सुमारे ३ लाखाने जास्त असून, सध्या या ऑनलाईन आरक्षण प्रणालीव्दारे दररोज १० हजार तिकीटे काढली जात आहेत.प्रवाशांना घरबसल्या एसटीचे तिकीट उपलब्ध करुन देण्याच्या उददेशाने एसटीने संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय केली आहे. तसेच मोबाईलवर ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट काढता येते. या दोन्ही पध्दतीव्दारे तिकीट काढण्याच्या प्रणालीमध्ये १ जानेवारीपासून बदल करुन त्या अदयावत करण्यात आल्या. त्यातील दोषांचे निर्मुलन झाल्याने ऑनलाईन आरक्षण प्रणाली प्रवाशांना वापरण्यास सोपी झाली आहे. दोन्ही प्रणालीव्दारे प्रवाशांना अमृत जेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्ती या सवलतीचे आगाऊ आरक्षण मिळू शकते. त्यासाठी संकेतस्थळाबरोबरच ॲपच्या वापर प्रवाशांनी करावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.- ऑनलाईन आरक्षण करताना तांत्रिक अडचण आल्यास ७७३८०८७१०३ या संपर्क साधावा.- नंबर प्रवाशांना तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी २४ तास सुरु आहे.- ऑनलाईन आरक्षण करताना पैसे भरुन तिकीटे न येणे (पेमेंट गेट वे संदर्भात) या तक्रारींसाठी ०१२०-४४५६४५६ या क्रमांकावर संपर्क करा.
एसटीचे प्रवासी झाले डिजिटल; दररोज काढली जातात १० हजार तिकीटे
By सचिन लुंगसे | Published: May 22, 2024 5:54 PM