ST Workers Strike: एसटी कामगारांच्या संपातून खोत, पडळकरांची माघार; आझाद मैदानातील आंदोलन तूर्तास मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 11:46 AM2021-11-25T11:46:35+5:302021-11-25T11:49:31+5:30
ST Workers Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपातून भाजप नेते खोत, पडळकर यांची माघार
मुंबई: गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेलं एसटी कामगारांचं आंदोलन आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं दिलेली वेतनवाढ व इतर मागण्यांवर घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचं म्हणत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. आहे. एसटी कामगारांनी उभारलेल्या लढ्याला मोठं यश आलं आहे. आता पुढील निर्णय कामगारांनी घ्यावा असंही खोत यांनी म्हटलं. यावेळी गोपीचंद पडळकरदेखील त्यांच्यासोबत होते.
राज्य सरकारनं बुधवारी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ जाहीर झाली केली. त्यानंतर भाजप आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनातून माघार घेत असल्याची घोषणा केली. एसटी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनात आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी उतरलो होतो असं सदाभाऊ खोत म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ मिळाली आहे. मात्र एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण करण्याची महत्त्वाची मागणी अद्यापही प्रलंबित आहे. सध्या विलिनीकरणाचा मुद्दा कोर्टात आहे. आंदोलनाला पहिल्या टप्प्यात मिळालेलं यश मोठे असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आंदोलनात उतरलो होतो, असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं. एसटी संप आम्ही चिघळवला असल्याचा आरोप निराधार असल्याचं त्यांनी म्हटलं.