पाकिस्तानी गस्ती नौकेच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या मच्छीमारांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून ५ लाखांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 07:27 PM2021-11-09T19:27:35+5:302021-11-09T19:28:02+5:30
मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती
शनिवार ६ नोव्हेंबर रोजी पाकिस्तान-ओखा (गुजरात) सागरी सीमारेषेवर पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीकडून गुजरात राज्याच्या पोरबंदर जिल्ह्यातील मासेमारी नौकेवर झालेल्या गोळीबारात पालघर तालुक्यातील वडराई गावातील श्रीधर चामरे (वय 30) याचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबाला राज्य सरकारच्या वतीने ५ लाख रूपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर खात्याचे मंत्री अस्लम शेख यांनी लोकमतला दिली.
गुजरातमधील वनगबरा येथील मालक नानजी राठोड यांच्या 'जलपरी' बोटीवर पालघर तालुक्यातील वडराई गावातील श्रीधर चामरे हा गेल्या तीन महिन्यांपासून खलाशी म्हणून काम करत होता.
गुजरात राज्याच्या ओखा बंदर येथील मासेमारी नौका 'जलपरी' मासेमारी करण्यास समुद्रात निघाली होती. ही मासेमारी नौका गुजरात राज्यातील ओखा येथे भारत पाकिस्तान हद्दी नजीक मासेमारी करीत असताना पाकिस्तानी मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीकडून भारतीय जलधी क्षेत्रात शिरकाव करून मासेमारी नौकेवर बेछूट गोळीबार करण्यात आला. यात वडराई गावातील तरुण मच्छिमार श्रीधर चामरे यांचा या गोळीबारत दुर्दैवी मृत्यू झाला होता.