- सदानंद नाईक
उल्हासनगर : लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी, व्यापारी हवालदिल झाले असून राज्य सरकारने राज्यासाठी १० हजार कोटीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी बीएसपी अध्यक्ष अॅड संदीप ताजने, महासचिव प्रशांत इंगळे यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे केली. तसेच, शेतकऱ्याच्या बँक खात्यात १० हजार रुपये जमा करण्याची मागणी यावेळी केली. (CoronaVirus Lockdown : The state government should announce a package of Rs 10,000 crore, BSP demanded from the governor)
राज्यात कोरोनाचा भयंकर उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर बीएसपीच्या शिष्टमंडळाने राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शुक्रवारी दुपारी भेट घेतली. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे व्यापार ठप्प होऊन कामगारांची उपासमार होणार असल्याची चर्चा झाली. संपूर्ण जनता हवालदिल झाली असून आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असल्याची माहिती यावेळी शिष्टमंडळातर्फे बीएसपी प्रदेश अध्यक्ष संदीप ताजने, महासचिव प्रा. प्रशांत इंगळे दिली.
याचबरोर, राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून खाजगीमधील सर्व आरोग्य सेवा अनुदानित करावी. तसेच आरोग्य यंत्रणेवरील भार कमी करण्याचे उपाय करावे आणि कुणीही उपचाराविना राहणार नाही, याची काळजी घ्यावी. राज्यात विनावेतन असणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्वांना प्रत्येकी दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे कुटुंबातील किमान चार सदस्यांना तरी ही मदत मिळावी. आदी मागण्या केल्या आहेत.
कोरोना तपासणी केंद्र वाढवावे आणि आठ तासाच्या आत मोबाईलवर अहवाल द्यावा. रेमडिसिवर इंजेक्शनची किंमत कमी केल्यानंतरही एमआरपीनुसार वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने सर्वांना हे इंजेक्शन निशुल्क उपलब्ध करून द्यावे. सरकारने लॉकडाऊन स्थिती तयार केलेली आहे. लहान-मोठे व्यवसाय उद्योगधंदे आणि इतर कामे ठप्प आहेत. लोकांकडे पैसे नाहीत त्याकरिता वीज बिल माफ करावे.
विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तातडीने द्यावी, शाळा महाविद्यालयांचे शुल्क माफ करावे, खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना बी बियाणे व खते मोफत द्यावे, व्यापारी वर्ग हॉटेल्स व दुकाने यांना संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालू राहण्यास परवानगी द्यावी. दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात विद्यार्थ्यांचे जीव विनाकारण धोक्यात घालू नये. आदी मागण्याचे निवेदन राज्यपाल यांच्याकडे दिल्याची माहिती प्रदेश महासचिव प्रा. प्रशांत इंगळे यांनी दिली.