अहिराणीला देणार राज्य भाषेचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2017 02:26 AM2017-05-29T02:26:32+5:302017-05-29T02:26:47+5:30

खान्देशात साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या बोलण्यातून गाण्यांमधून अहिराणी भाषेची जोपासणा केली. अहिराणी भाषेचा

State language status to Ahirani | अहिराणीला देणार राज्य भाषेचा दर्जा

अहिराणीला देणार राज्य भाषेचा दर्जा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भोसरी : खान्देशात साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या बोलण्यातून गाण्यांमधून अहिराणी भाषेची जोपासणा केली. अहिराणी भाषेचा गवगवा हा नुसताच खान्देशात नसून तर संपूर्ण देशभरात आहे. या भाषेच्या संवर्धनासाठी तसेच
अहिराणी भाषेला राज्यभाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी केले.
भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात रविवारी पाचव्या खान्देशी अहिराणी संमेलनाचे थाटात उद्घाटन झाले. त्या वेळी विनोद तावडे बोलत होते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य, सांस्कृतिक, कला, क्रीडा मंंच पुणे यांच्या संयुक्तविद्यमाने पाचव्या एकदिवसीय राज्यस्तरीय अहिराणी संमेलनाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. या वेळी संमेलनाध्यक्ष वि. दा. पिंगळे, संमेलन स्वागताध्यक्ष नगरसेवक नामदेव ढाके, आमदार महेश लांडगे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, कला, क्रीडा-साहित्य समिती सभापती लक्ष्मण सस्ते, शहरसुधारणा समिती सागर गवळी, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, नगरसदस्य संतोष लोंढे, नगरसदस्या सोनाली गव्हाणे, भीमाबाई फुगे, अ‍ॅड. नितीन लांडगे, आशा शेंडगे, माधुरी कुलकर्णी, बाळासाहेब ओव्हाळ, खान्देश अहिराणी कस्तुरी मंचच्या अध्यक्षा विजया मानमोडे आदी उपस्थित होते.
तावडे म्हणाले, ‘‘प्रत्येक बोलीभाषा टिकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जुन्या पिढीला बोली भाषेविषयी थोडीशी जरी माहिती असते. परंतु, नवीन पिढी यापासून अज्ञान राहत आहे.
अहिराणी ही भाषा ५ हजार वर्षांपूर्वीची आहे. महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदूरबार, नाशिक या भागापूरतीच ही भाषा मर्यादित
नसून राजस्थानमध्येही अहिराणी बोलली जाते. अहिराणी भाषेचा गोडवा इतका की, समोरच्याने आपल्याला शिवी जरी दिली. तरी ती पुन्हा ऐकाविशी वाटते. असे सांगत त्यांनी अहिराणी भाषेवर संशोधन करणाऱ्यांना शिष्यवृत्ती देणार आहे. अहिराणी भाषेचे संशोधन केंद्र उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करावा.’’

बैलजोडी : ग्रंथदिंडीने अहिराणीचा जागर

सकाळी डोंगर हिरवागार, माय तूना डोंगर हिरवागार, कानबाई चालली गंगेवरी व माय चालली गंगेवरी अशा विविध अहिराणी गीतांच्या तालावर नाचत गाजत भोसरी येथील पीएमटी चौकापासून ते अंकुशराव लांडगे नाट्यगृहापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीत भारताचे संविधान, अहिराणी गाथा व ज्ञानेश्वरीचे पूजन झाले. या वाजत-गाजत निघालेल्या दिंडी सोहळ्यात सहभागी महिलांनी अस्सल अहिराणी वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात रंगत आणली. ग्रंथदिंडीत शेतकऱ्यांचा अभिमान असलेली बैलजोडीची सजावटदेखील आकर्षणाचा भाग ठरली.


मन्हा खान्देशन्या बांधवास्न कार्यक्रम म्हा स्वागत
पुरा खान्देशनी अराध्य दैवत माय सप्तश्रृंगी देवीले नमन करीसनी या कार्यक्रम म्हा उपस्थित मन्हा आख्या भाऊ-बहिनीस्न स्वागत.... अशा शब्दांत मंत्री विनोद तावडे यांनी आपल्या उद्घाटनपर मनोगताची सुरुवात केली. एकही शब्द न अडखळता अहिराणी भाषेचा उच्चार करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. राज्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात एकाही सांस्कृतिक मंत्र्याने आपल्या भाषणात अहिराणी भाषा बोलली का? राजकीय स्तरावरच या प्राचीन बोलीभाषेला सन्मान मिळवून देणे गरजेचे आहे आणि सरकार हे काम करेल, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. त्यावर उपस्थित प्रेक्षकांनी त्यांना दाद दिली.

पुरस्कारार्थींचा गौरव
‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांना समाजभूषण, ज्येष्ठ साहित्यिक बापूसाहेब पिंगळे यांना जीवन गौरव, नगरसेवक नामदेव ढाके यांंचा विशेष सन्मान झाला. यासह मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड (खान्देश कोहिनूर), शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव (कुशल प्रशासक), प्रताप हरी पाटील (शिक्षण तपस्वी) वनमाला बागूल (कला गौरव), राजन लाखे (साहित्य गौरव) शिवाजी साकेगावकर, महेंद्र पाटील, प्रशांत पाटील (उद्योगरत्न), प्रफुल साळुंखे, विशाल ठाकूर (पत्रकारिता), अनुराधा घोडके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title: State language status to Ahirani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.