आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५ : शिवाजी सुरवसे सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियानामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल सोलापूर जिल्ह्याला राज्यातील पहिला पुरस्कार जाहीर झाला आहे़ ५० लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे़ बार्शी तालुक्यातील मळेगावने या अभियानात केलेले काम राज्यात उत्कृष्ट ठरले. यासाठी २५ लाखांचा पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती जलयुक्त शिवार अभियानाचे समन्वयक रवींद्र माने यांनी दिली़ राज्यात शसनाने पाच डिसेंबर २०१४ अन्वये जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे़ जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या जिल्हा-तालुका-गावांच्या पुरस्काराची घोषणा शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने शनिवारी केली़ याबाबत शासन आदेश देखील पारित केला आहे़ हे पुरस्कार सन २०१५-१६ या वषार्चे आहेत़ सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी जलयुक्तमध्ये धडाकेबाज काम केले. त्यांना जिप़चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी देखील जोरदार साथ दिली़ राज्यात सोलापूरचे काम अव्वल झाल्यामुळे सोलापूरला आता महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार या ५० लाखांचा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे़ रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे प्रत्येक पुरस्काराचे स्वरुप आहे़ बार्शी तालुक्यातील मळेगावने गाव तलावाचे पुनरुज्जीवन,लोकसहभागातील कामे यामध्ये आदर्शवत काम केले. त्यामुळे सरपंच गुणवंत मुंढे यांच्या कामाला देखील राज्यस्तरीय २५ लाखांचा पुरस्कार देऊन शासनाने सलामी दिली आहे़ जिल्ह्यांतर्गत पुरस्कारासाठी दोन तालुके या पुरस्कारासाठी निवडायचे होते़ यासाठी सांगोला आणि मंगळवेढा यांचा क्रमांक लागला असून त्यांना अनुक्रमे पाच आणि तीन लाखांचा पुरस्कार जाहीर झाला़ तर जिल्हांतर्गत गाव पुरस्कारासाठी पाच गावे निवडायची होती. यामध्ये खुपसंगी (मंगळवेढा), डोंगरगाव (सांगोला), वाढेगाव (सांगोला), पाडळी (करमाळा), पानमंगरुळ (अक्कलकोट) या गावांची निवड करण्यात आली आहे़ अधिकारी, संस्था यांचे विभागस्तरावरील पुरस्कार अद्याप जाहीर झाले नाहीत़राज्यात जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल सोलापूर, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांना तर तालुकास्तरावर पुरंदर, कोरेगाव, सातारा, चांदवड आणि गाव पातळीवर मळेगाव, वेळू, कर्जत या गावांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे सन २०१५-१६ चे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. जलयुक्तसाठी जिल्हा, तालुका, गाव, व्यक्ती/वैयक्तिक संस्था, अधिकारी/कर्मचारी, पत्रकार व इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागस्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार, तर जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. -------------------जलयुक्त मधील पुरस्कार -सोलापूर जिल्ह्यासाठी राज्याचा पहिला ५० लाखांचा पुरस्कार-मळेगाव (ता़ बार्शी)-राज्यस्तरीय २५ लाखांचा प्रथम पुरस्कार-सांगोला तालुक्याला जिल्ह्यांतर्गत पाच लाखांचा पुरस्कार-मंगळवेढा तालुक्याला जिल्ह्यांतर्गतचा तीन लाखांचा पुरस्कार-खुपसंगी (मंगळवेढा) गावास जिल्ह्यांतर्गतचा १ लाखाचा पुरस्कार-डोंगरगाव (सांगोला)गावास जिल्ह्यांतर्गतचा ७५ हजारांचा पुरस्कार-वाढेगाव (सांगोला) गावास जिल्ह्यांतर्गतचा ५० हजारांचा पुरस्कार-पाडळी (करमाळा) गावास जिल्ह्यांतर्गतचा ३० हजारांचा पुरस्कार-पानमंगरुळ (अक्कलकोट) गावास जिल्ह्यांतर्गतचा २० हजारांचा पुरस्कार---------------------सोलापूरचा राज्यात दबदबासोलापूरला राज्यस्तरीय पुरस्कारांची मालिका सुरू झाली आहे़ जलयुक्तमध्ये जिल्ह्याला पहिला पुरस्कार, मळेगावला राज्यातील पहिला पुरस्कार जाहीर झाला आहे़ दोनच दिवसापूर्वी यशवंत पंचायत राज अभियानात सोलापूर जिप़ला २० लाखांचा राज्यस्तरीय दुसरा पुरस्कार मिळाला तर अक्कलकोट पंचायत समितीला पुणे विभागातील पुरस्कार मिळाला़ सहकार खात्याच्या वतीने देण्यात येणाऱ्या श्रीपूरच्या पांडुरंग कारखान्यास ५१ हजारांचा सहकार भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे़ याशिवाय सोलापूर हे स्मार्ट सिटीमध्ये देखील आल्यामुळे राज्यात सोलापूरचा दबदबा वाढला आहे़
सोलापूरला जलयुक्त शिवार योजनेचा ५० लाखांचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार
By admin | Published: April 15, 2017 8:05 PM