विलीनीकरण होईपर्यंत स्टिअरिंग हातात नाही, घंटीही वाजणार नाही, एसटी कर्मचाऱ्यांमध्ये­ सरकारविरोधात नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 11:00 AM2021-11-25T11:00:41+5:302021-11-25T11:01:34+5:30

नाशिक येथील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, सर्व कर्मचारी विलीनीकरणावर ठाम आहोत. जोपर्यंत डंके की चोट पर विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत स्टिअरिंग हातात घेणार नाही, बसची घंटी वाजणार नाही. ऑईल बदली होणार नाही.

The steering wheel is not in hand until the merger, nor will the bell ring | विलीनीकरण होईपर्यंत स्टिअरिंग हातात नाही, घंटीही वाजणार नाही, एसटी कर्मचाऱ्यांमध्ये­ सरकारविरोधात नाराजी

विलीनीकरण होईपर्यंत स्टिअरिंग हातात नाही, घंटीही वाजणार नाही, एसटी कर्मचाऱ्यांमध्ये­ सरकारविरोधात नाराजी

googlenewsNext

मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात आली आहे. या वेतनवाढीवरून कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. वेतनवाढ मिळाली तरी विलीनीकरण होईपर्यंत आंदोलन कायम राहणार अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण ही प्रमुख मागणी घेऊन सरकार विरुद्ध एसटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे.

नाशिक येथील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, सर्व कर्मचारी विलीनीकरणावर ठाम आहोत. जोपर्यंत डंके की चोट पर विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत स्टिअरिंग हातात घेणार नाही, बसची घंटी वाजणार नाही. ऑईल बदली होणार नाही. आटपाडीतील एका एसटी कर्मचाऱ्याने सांगितले की, विलीनीकरणाच्या मागणीवर सरकारकडून कोणताही निर्णय घेतला जात नाही; पण आता तुटपुंजी वेतनवाढ देऊन आमच्या तोंडाला पाने पुसली आहेत. विलीनीकरण होईपर्यंत संप सुरूच ठेवणार आहे.

अकलूज येथील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, राज्य सरकारने जाहीर केलेली अंतरिम पगारवाढ ही कर्मचाऱ्यांना मान्य नाहीच. कर्मचाऱ्यांची मागणी मुळात पगारवाढ नाही. एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करून कर्मचारी हा राज्य सरकारी कर्मचारी म्हणून ओळखला गेला पाहिजे. ज्या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात त्यांच्याबद्दल ब्र शब्दही न काढता तुटपुंजी पगारवाढ जाहीर केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 

कामगारांना आवाहन करतो की,  आजचा एक दिवस तुम्ही शांततेत विचार करा. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. ज्या ठिकाणी मंत्रिमंडळाची पत्रकार परिषद झाली, त्या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो. त्या पत्रकार परिषदेत सरकारने सकारात्मक भूमिका जाहीर केली आहे. पण, आम्ही तुमच्यासोबत आहोत. जो निर्णय तुम्ही सर्व मिळून घेणार, तो अंतिम निर्णय असणार आहे.  रात्रभर चर्चा करून निर्णय घेऊ आणि आपला निर्णय झाल्यानंतर उद्या  पत्रकार परीषदेत जाहीर करू. 
- सदाभाऊ खोत, माजी मंत्री  

सरकारने दिलेल्या प्रस्तावावर एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत. आम्ही कर्मचाऱ्यांसोबत आहोत, पण यातून काही मध्यम मार्ग निघत असेल, तर या प्रस्तावावर कर्मचाऱ्यांशी आम्ही सकारात्मक चर्चा करणार आहोत. आपले दुकान बंद असल्याने अनेक अतृप्त आत्मे नाराज झाले आहेत. मी आणि सदाभाऊ खोत १५ दिवसांपासून ठाण मांडून बसलो आहोत.  आमच्यावर टीका करण्यात येत आहे. पण, आम्हाला त्याची पर्वा नसून कर्मचाऱ्यांचे हित महत्त्वाचे आहे.
- गोपीचंद पडळकर, आमदार

- एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी राज्य सरकारसोबत पहिली बैठक झाली.

- बुधवारी सह्याद्री अतिथिगृहात पुन्हा एकदा चर्चेच्या फेरी सुरू झाली. बुधवारी चर्चेच्या दोन फेऱ्या पार पडल्या. यात परिवहनमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ आणि पडळकर, खोत उपस्थित होते.

- चर्चेनंतर मंत्री परब आणि सामंत मंत्रालयाकडे रवाना झाले. मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. बैठकीतील प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. अजित पवारांसोबतच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रस्तावाला मान्यता घेण्यासाठी परब हे एच. एन. रिलायन्स रुग्णालयाकडे रवाना झाले. तिथे मुख्यमंत्र्यांची मान्यता घेतल्यानंतर परब सह्याद्री अतिथिगृहात परतले.

- सह्याद्री अतिथिगृहात कर्मचारी शिष्टमंडळाला मान्यता घेतलेल्या प्रस्तावाची माहिती दिली. माध्यमांसमोर बोलताना पगारवाढीची घोषणा केली. सरकारचा प्रस्ताव ऐकला आहे. या प्रस्तावावर कर्मचाऱ्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगून पडळकर आणि खोत आझाद मैदानाकडे रवाना झाले.
 

Web Title: The steering wheel is not in hand until the merger, nor will the bell ring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.