पवार कुटुंबामध्येही काड्या लावल्या, आता आदित्य अन् तेजस ठाकरेंमध्ये...; नितेश राणेंचा संजय राऊतांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 01:47 PM2023-11-13T13:47:02+5:302023-11-13T13:47:32+5:30
जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली होती तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुमची गाडी का फोडली होती, असा सवाल नितेश राणेंनी केला आहे.
संजय राऊत यांनी आज दोघांमध्ये भांडणे होतात का पाहणे, फोडा आणि राज्य करा ही भाजपाची नीती असल्याची टीका केली होती. यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना प्रत्यूत्तर दिले आहे. जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली होती तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुमची गाडी का फोडली होती, असा सवाल नितेश राणेंनी केला आहे.
ठाकरे घराण्यात ज्या काही काड्या आणि भांडणं लावत होतात, त्याचमुळे तुम्हाला फिरायला दिले नाही. पवार घराण्यामध्ये तुम्ही काय काड्या लावल्यात ही माहिती महाराष्ट्राला दिली तर कुणी तुम्हाला घरात देखील उभे करणार नाही. आता तुमच्या मालकाच्या घरात तेजस आणि आदित्य ठाकरेंमध्ये भांडण कोण लावतेय, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अशी अश्लील भाषा वापरताना तुम्हाला लाज वाटली नाही का? आजकाल तुमचा पगार 10 जनपथवरून येतोय, वेणूगोपाल धूत यांच्याकडून किती पगार येतो असा सवाल करत माहिती खोटी असेल तर बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगा पगार येत नाही म्हणून असे आव्हानही राणे यांनी दिले.
महाविकास आघाडीचे नेते म्हणत आहेत जे काही पवार साहेबांचे कास्ट सर्टिफिकेट फिरत आहे ते नागपूरवरून आलेय, भाजपचे षडयंत्र आहे. भाजपवर आरोप करण्याअगोदर संजय राऊतच्या मांडीवर मांडी लावून बसताय त्यांना आधी विचारा सुजित पाटकर त्याचा मानसपुत्र, त्याला खोटे SC सर्टिफिकेट कोणी काढून दिले, असेही राणे म्हणाले.
रोहित पवारांवर टीका करताना राणे यांनी आजकाल राज्यात चेहरा वाचणारा नवीन ज्योतिषी आलाय, असे सांगितले. त्याला अजित पवारांच्या चेहऱ्यावर काय लिहिलेय, फडणवीस कुणाच्या मागे आहेत या सर्वच बाबतीत भविष्यवाणी करत आहे. तो म्हणजे ओसाड गावाचा पाटील रोहित पवार असे म्हणत स्वतःच्या मतदारसंघाच्या मतदारांचा कधी चेहरा वाचायला त्यांना जमले नाही, वेळ मिळाला नाही, असा टोला लगावला. ओसाड गावच्या पाटलाने स्वतःच्या मतदार संघातील लोकांचे चेहरे वाचावेत नाहीतर 2024ला तुमचा बाजार उठणार हे निश्चित झालेय, असा इशारा राणे यांनी दिला.