कष्टक-यांचे ‘कैवारी’, असंघटित कामगारांचे ’पालनकर्ते’, संयुक्त महाराष्ट्र, गोवा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात झोकून देणारा ‘स्वातंत्र्यसैनिक’ अशा अनेक बिरूदांनी समाजात वलय प्राप्त केललं व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ कामगार नेते ‘ डॉ. बाबा आढाव’. शनिवारी ( 1 जून) रोजी बाबांनी वयाची 90 वर्षे पूर्ण केल्याबददल ‘लोकमत’शी संवाद...
नम्रता फडणीस* तुम्ही स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या काळाचे साक्षीदार ठरला आहात? ही स्थित्यंतरे अनुभवताना काय निरीक्षण नोंदवता?- देशाची स्वातंत्र्य चळवळ, मराठवाडा मुक्ती आंदोलन, गोवा स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ यांचा मी साक्षीदार ठरलो. या काळात मी समाजवादाशी जोडला गेलो. माझ्यावर समाजवादाचे संस्कार राष्ट्रसेवा दल आणि कॉग्रेसमुळे झाले.महात्मा गांधींना प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यावेळी मी केवळ 17 वर्षांचा होतो. त्यांची हत्या झाल्यानंतर गोड खाल्ले नव्हते. इतका माझ्यावर गांधीचा प्रभाव होता. गोडसे यांनी गांधीवर गोळी झाडली. कारण त्याला गांधीजींचा राष्ट्रवाद मान्य नव्हता. त्याला हिंदू राष्ट्र हवे होते. आज गोडसेचा उदो उदो केला जातो.त्याला हुतात्मा ठरवले जात आहे. एकप्रकारे गांधीजींनी जी राष्ट्रवादाची पायाभरणी केली ती पुसून टाकण्याचा प्रकार सुरू झाला आहे. * आज कोणत्या प्रकारचा राष्ट्रवाद आणला जातोय,असं तुम्हाला वाटतं?- आर्थिक विषमता पराकोटीची होते.तेव्हा फँसिस्ट विचार आणले जातात.ब्रिटीशच केवळ ‘डिव्हाईड इन रूल’ करत होते असे नव्हे तर आपणही सत्ता टिकविण्यासाठी करतो. तिचं स्थिती आज आहे. गांधी नेहमी म्हणायचे की येणारे स्वातंत्र्य हे शेतकरी आणि कामगारांचे आहे. मात्र सध्या वारे विरूद्ध दिशेने वाहात आहेत. साध्वी प्रज्ञा सिंह बहुमताने निवडून येते हा चिंतनाचा विषय आहे. * भारताला आंदोलन आणि चळवळींचा एक इतिहास आहे. मात्र आज त्या चळवळी मागे पडल्या आहेत, यामागे कोणती कारणे आहेत?-आमची पिढी स्वातंत्र्यपूर्व काळातील असल्यामुळे आमच्यावर चळवळीचे संस्कार होते. आंदोलनातून जे संस्कार व्हायचे ती आंदोलनच आज राहिलेली नाहीत. भारतात चळवळी देखील फारशा उरलेल्या नाहीत हे वास्तव आहे. त्याचेही विश्लेषण झालं पाहिजे. स्वातंत्र्यानंतर जो एक मध्यमवर्ग तयार झाला तो आपल्या कोशातच राहिला. साहित्यामध्येही कुठेच त्याची प्रतिबिंब उमटली नाहीत. त्यामुळं आजच्या पिढीवर कोणाचे संस्कार होणार असा मला प्रश्नच पडतो. * आजच्या पिढीपुढं कोणती आव्हानं आहेत असं वाटतं?-इतिहासात रमणं सोपं असतं, छत्रपती शिवाजी महाराज किंवा छ्त्रपती संभाजी महाराजांचा पुरूषार्थ पाहून अभिमानाने उर भरून येणंही सोपं असतं. परंतु दु:ख याचं वाटत की इतिहास कितीतरी पुढं गेला तरी आम्ही भूतकाळातच रमत आहोत. सावित्रीबाई फुले यांनी हातात लेखणी दिली नसती, आंबेडकरांमुळे मतदानाचा अधिकार मिळाला नसता तर चित्र बदलले असते का? याचाही विचार तरूणपिढीने करणं गरजेचं आहे. * कष्टकरी, असंघटितांच्या आयुष्यात ‘अच्छे दिन’ आलेत असं वाटतं का? - देशात 125 कोटी पैकी जवळपास 50 कोटी असंघटित कामगार आहेत. सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. आजही कामगार बारा-बारा तास काम करीत आहेत. मात्र त्यांना काही मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. कष्टकरी स्त्रियांचे चित्र बदलले नाही. देशामध्ये कामगारांच्या श्रमातूनच अर्थसंचय निर्माण होतोय, मात्र हे आम्ही अजूनही मान्य करत नाही. सामाजिक सुरक्षा कायदा १० वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. तरीही अद्याप आपल्या देशातील असंघटित कामगार क्षेत्राला पुरेशी सुरक्षा आपण देऊ शकलो नाही, हे दुर्देवी वास्तव आहे. * समाजवादी किंवा कॉंग्रेस पक्ष असो. या पक्षांकडे नवी फळी तयार होऊ शकली नाही. पक्षांकडे नवा चेहराच नाही, ही पक्षांच्या अधोगतीची कारणे आहेत असे वाटते का? - हे मान्यच आहे. ज्या राष्ट्रसेवा दलात वाढलो त्याची अवस्था आज काय झाली आहे. पण त्या चुका कुणी केल्या. त्यावेळी राजकीय महत्वाकांक्षा असलेल्या पुढा-यांनी पक्षाचा बळी दिला. हे आज सांगितलं पाहिजे की 1966 साली मधु दंडवते यांची पत्नी निवडणुकीला उभी राहिली आणि तेव्हा समाजवाद्यांनी शिवसेनेबरोबर समझोता केला. इतकचं नव्हे तर आणीबाणी नंतर पक्ष विसर्जित करण्याची घाई कुणी केली? ही अपयश पाहिली असल्यामुळं आज स्तब्ध आहे. याची उत्तर माझ्याकडं नाहीत. पण तरीही आशा वाटते. जनता नावाची गोष्ट आम्हाला तारेल. ----------------------------------------------------------