केबल तुटल्याने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे काम ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 04:56 PM2019-02-12T16:56:15+5:302019-02-12T17:00:43+5:30
मंगळवारी राज्यभरातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
पुणे: राज्य शासनाच्या आदेशानुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे (आजीआर) कामकाज जानेवारी महिन्यापासून क्लाऊडच्या माध्यमातून सुरू करण्यात आले. मात्र,मंगळवारी (दि.१२) मुंबई येथे महापेजवळ केबल तुटल्याने नेटवर्क कनेक्टिवीटी विस्कळीत झाली.परिणामी विभागाचे संकेतस्थळ बंद पडले. यामुळे सकाळपासून दुपारी चार वाजेपर्यंत विभागाचे कामकाज पूर्णपणे बंद राहिले.मंगळवारी राज्यभरातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
राज्य शासनाला सर्वाधिक महसूल मिळवून देणा-या विभागापैकी एक,अशी ओळख असलेल्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या कामात अनेक अडथळे येत आहेत.पूर्वी सर्व्हरमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या कामकाजावर परिणाम होत होता. त्यामुळे आयजीआर विभागाचे काम क्लाऊडवरून सुरू झाले. परंतु, गेल्या महिन्यात २१ जानेवारी रोजी नेटवर्क कनेक्टिविटी विस्कळीत झाल्याने सकाळीपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संकेतस्थळ पूर्णपणे बंद होते. त्यानंतर मंगळवारी (दि.१२)पुन्हा एकदा महापेजवळ केबल तुटल्याने राज्यातील सर्वच दस्त नोंदणी कार्यालयातील व्यवहार ठप्प झाले. राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या माध्यमातून दररोज संकेतस्थळावरून सुमारे आठ ते दहा हजार दस्त नोंदणी होते. परंतु,संकेतस्थळ बंद असल्याने मंगळवारी चार वाजेपर्यंत केवळ ५७८ दस्त नोंदविले गेले.
नोंदणी व मुर्द्रांक शुल्क विभागाच्या उपमहानिरीक्षक सुप्रिया करमरकर- दातार म्हणाल्या,सकाळपासूनच संकेतस्थळ धिम्या गतीने सुरू आहे.डेटाबेस विषयक पीजी बाऊंसरचे काम सुरू आहे. त्यात महापे येथे डेटा सेंटरची फायबर केबल तुटल्यामुळे संकेतस्थळ बंद पडले. परंतु,विभागातर्फे दुरूस्तीचे काम सुरू आहे.
-----------------------
राज्याचे नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे म्हणाले,डेटाबेस विषयक पीजी बाऊंसरचे काम सुरू असल्याने संकेतस्थळ बंद आहे.परंतु,याबाबतचे काम लवकरच पूर्ण करून संकेतस्थळ सुरळीतपणे सुरू केले जाईल.