मुन्नाभाई नंदागवळी
बाराभाटी (गोंदिया) : मानव तंत्रज्ञानाच्या युगात खूप प्रगती आणि उंची गाठण्याची हौस प्रत्येकात निर्माण व्हावी हा सर्वाचा प्रयत्न असतो, पण विज्ञानवादी, जगण्याचा सम्यक सन्मार्ग प्राणी मात्राचा जीवन शोधणारी महापुरुष व मोठी माणसं होऊन गेली आणि झाली, अशाच प्रकारची एक प्रेरणा घेणारा, अवलिया व्यक्तिमत्त्व म्हणजे जगदीश मेश्राम. मांजर, कुत्री, जनावरे व रानातील माकडे यांच्या जीवाची काळजी करुन त्यांचे सुख सोधून आपले प्राण्यांशी नाते जोडले आहे, ही एक अनोखी नात्यांची कथा पाहण्यास मिळाली.
परिसरातील येरंडी-देवलगाव या गावचा राहणारा जगदीश बकाराम मेश्राम (वय ५१) हलाखीच्या परिस्थितीत जगदीश एकटाच स्वतःचे जीवन प्रामाणिकपणे जगतो आहे. या गावात अनेक व्यक्तिमत्त्वांची वेगळीच ओळख असून परिचीत आहे. काही वर्षांपुर्वी कुटुंबातील माणसे सोडून गेली. जगदीश हा बी.एस्सी. शिकलेला असून इंग्रजीचे वाक्य फाळफाळ बोलतो, पूर्वीपासून हुशार होता पण परिस्थितीने हतबल केले, या सर्व दुःखावर मात करुन आंनदाने प्राण्यांच्या सहवासात जगदीश आजही जीवन जगत आहे.
जगदीशच्या मनावर अनेक महामानव व महापुरुषांच्या विचारांचा पगडा आहे, म्हणूनच अहिंसावादी बुद्धांचा प्राणीमात्रावर दया करा, असा विचार घेऊन हा अवलिया प्राण्यांच्या सहवासात रमतो आहे. जगदीश राहतो तिथे सोबत मांजर व कुत्री राहतात. जणू परिवारच झाल्यागत...पोट भरण्यासाठी अनेक काम पाहणे तर कधी मागून खाणे, भाजीपाला बाजारात मागणे, अशारितीने जगदीश आंनदाचे जीवन गाणे गात जगतो. भाजीपाला जर जास्त असला तर तो जनावरांना खाऊ घालतो, फळ वेगेरे मिळाली तर तो सोबत राहणा-या सदस्यांच्या सोबत खातो. कुठे कार्यक्रमात जेवायला गेला तर स्वतः तिथे खातो आणि राहणा-या मांजर व कुत्रीसाठीही घेऊन जातो. गावालगत अमराई आहे, अमराईत जंगलातील माकडांचा समुह राहतो, त्या बारा-पंधरा माकडांना दररोज जगदीश सकाळ, दुपार व सायंकाळी या वेळेत गावातील पाणी माकडांना पिण्यासाठी घेऊन जातो. हे काम तो तीन चार महिन्यांपासून करतांना जगदीश दिसतो आहे. अशा नात्याला व प्रेमाला काय म्हणावे.... ही जगदीशची किमयाच न्यारी... हे अनोखेच नातेसंबंध प्राण्यांशी जपतो तो फक्त जगदीश मेश्राम. ही सेवा, हे प्राण्याविषयीचे प्रेम मनात घर करणारे आहे, आपण मानवाला सहसा जपत नाही, तर येथे प्राण्यांना सुख समाधान देणारा माणूस पाहायला मिळतो. हा एक समाजाला आदर्शाचा उदाहरण असला पाहीजे.
मी बुद्धांपासून सर्व शिकलो, रोजच पाणी पाजतो, जेवनही देतो. या गोष्टीत मला सुख-समाधान मिळतो. हेच माझं काम आहे. - जगदीश बकाराम मेश्राम, येरंडी-देवलगाव
जगदीशच्या कार्याचे कौतुक तर केलेच पाहीजे, पण समाजाला एक आदर्श देण्याचेही काम केले, अशी जगदीशची माकडांना पाणी घेऊन जातांना ही वास्तववादी मुलाखत घेण्यास मिळाली. "प्राण्यांचे सुख हे जगदीशचे सुख" असे नातेसंबंध जोडून सुख देण्या-या कार्याला व आदर्शाला सलामच आहे.