सुनील शिंदे/ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 14 - घोटी सिन्नर मार्गावरील देवळे गावाजवळील दारणा नदीवरील पुलाचा मलबा अवजड वाहनांमुळे कोसळला. या पुलाला मोठे भगदाड पडले असून पुलावरील दोन्ही बाजूची वाहतूक शुक्रवारी सकाळपासून पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक साकुर फाटा व मुंढेगाव मार्गे वळवण्याचा निर्णय महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने घेतला आहे.
15 वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात आलेल्या देवळे गावाजवळील दारणा नदीवरील पूल जीर्ण झाल्याने चारच महिन्यापूर्वी या पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र हे काम अपूर्ण व नित्कृष्ट दर्जाचे झाल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकेदायक ठरला होता. हा पूल अवजड वाहनाच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना कळविले होते.
लोकमतनं वृत्ता प्रसारित करुन पूल धोकादायक झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि शासनाला दिली होती. मात्र वेळीच दखल न घेतल्याने अखेर गुरुवारी मध्यरात्री या पुलाचा मध्यभागी मलबा कोसळून पुलाला मोठे भगदाड पडले आहे. याची कल्पना वाहनचालकांना आल्याने त्यांनी पोलिसांना आणि तहसील विभागाला कळविले. शुक्रवारी सकाळी प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार अनिल पुरे, नायब तहसीलदार संजय शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आव्हाड, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी पुलाची पाहणी करीत हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तसेच सिन्नरकडील वाहतूक साकुरफाटा व घोटीहून जाणारी वाहतूक मुंढेगाव मार्गे वळवण्यात आली आहे.
सर्वसामान्यांचे हाल
दरम्यान, दारणा नदीवरील या पुलावरून सिन्नर शिर्डी, अकोले, पुणे, संगमनेर, भंडारदरा, टाकेद व तालुक्याच्या पूर्व भागाकडे जाणारी वाहतूक अवलंबून आहे. मात्र पुलावरील वाहतूक बंद केल्याने या भागातील सर्वच गावाचा घोटी शहराशी संपर्क तुटला आहे.