संतोष भिसेसांगली : लॉकडाऊन काळात ऑनलाइन किंवा ऑफलाइन वर्गांना गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश न देण्याचा निर्णय खासगी इंग्रजी शाळांनी घेतला आहे. इन्डिपेन्डन्ट इंग्लिश स्कूल्स असोसिएशन (इसा) या संघटनेच्या राज्यभरातील ४ हजार २०० खासगी इंग्रजी शाळांनी हा निर्णय घेतला आहे. वर्गांना अनुपस्थित राहिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या हेतूने निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र दायमा यांनी दिली.
जून-जुलैपासून ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. त्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरपासून मर्यादित विद्यार्थ्यांसह प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले. राज्यभरात सुमारे १५ ते २० टक्के विद्यार्थी ऑनलाइन किंवा ऑफलाइन या दोन्ही माध्यमांत शाळेच्या संपर्कात राहिले नाहीत. शिक्षणाच्या प्रवाहापासून दूरच राहिले. यातील अनेकांनी कोरोनामुळे स्थलांतर केले. स्थलांतराच्या प्रक्रियेत जुन्या शाळेपासून दुरावले, तसेच नव्या शाळेतही प्रवेश घेतला नाही. अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देणे म्हणजे त्यांचे न भरून येणारे शैक्षणिक नुकसान करण्यासारखे आहे. अभ्यासक्रम पूर्ण न केल्याने कोणत्याही ज्ञानाशिवाय ते पुढील वर्गात जातील, त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन ‘इसा’ संघटनेने हा निर्णय घेतला आहे.