कोल्हापूर : जातिभेद निर्मूलन, कृषिविकास, शिक्षण आणि उद्योग या सर्वच क्षेत्रांत राजर्षी शाहूंची दृष्टी अतिशय व्यापक होती. आपल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी या क्षेत्रात प्रयोग करत स्वराज्यातून सुराज्य कसे निर्माण करता येईल, हे दाखवून दिले. शाहूंचे हे वैचारिक मॉडेल देशामध्ये अमलात आणले तर सामाजिक क्रांती होईल, असे उद्गार ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी शुक्रवारी काढले. येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतफेर् तिसावा शाहू पुरस्कार भाई वैद्य यांना ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.वैद्य म्हणाले, आरक्षण, विविध जातींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची निर्मिती, राधानगरी धरण हे दूरदृष्टीचे निर्णय शाहूंनी त्या काळात घेतले. सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करीत शैक्षणिक क्षेत्रातील विषमताही संपवण्याचे शाहूंचे कार्य शासनकर्त्यांना मार्गदर्शक आहे. एक शासक काय-काय करू शकतो, याचा आदर्श पाठच शाहूंनी करवीर संस्थानामध्ये घालून दिला. (प्रतिनिधी)
सुराज्याचे मॉडेल शाहूंनी देशाला दिले
By admin | Published: June 27, 2015 2:10 AM