बुलडाणा : दोन मुलींसह धरणात उडी मारणार्या मातेचा एका मुलीसह बुडून करुण अंत झाल्याची घटना येळगाव धरण परिसरात बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेने तीन वर्षीय चिमुरडीचे प्राण वाचले आहे. मृतक महिलेचे नाव सरला मोरे (३0 वर्ष) असून, ती शहर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या चांडक ले-आऊट येथील रहिवासी व पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अतुल मोरे यांची पत्नी आहे. मोरे नेहमीप्रमाणे कामावर जात असताना सरला तिने आज शिवण क्लासला जाते, म्हणून त्यांना सांगितले होते. दरम्यान, सरला हिने स्मृती (वय ६) व श्रावस्ती (वय ३) या दोघींना सोबत घेतले. शिवण क्लासला न जाता तिने मुलींसह थेट येळगाव धरण गाठले. यावेळी येळगाव धरण परिसरात कमी गर्दी होती. काही व्यक्तींनी त्यांच्याकडे धरण परिसरात फिरायला आले म्हणून लक्ष दिले नाही. दरम्यान, येळगाव धरणावरील सुरक्षा रक्षक राहुल देवीदास बाजारे यांनी सरला हिला दोन्ही मुलींसह धरणाच्या काठावर पाहिले होते; मात्र थोड्या वेळानंतर धरण काठावर कोणीच दिसले नाही, म्हणून शंका आल्याने बाजारे यांनी धरण काठाकडे धाव घेतली. यावेळी धरणात काही अंतरावर सरला मोरे बुडताना दिसली, तिच्या पाठीवर स्मृती हिला रूमालाने बांधले होते. लहान मुलगी श्रावस्ती काठाच्या दिशेने बुडत होती. बाजारे यांनी त्वरित धरणात उडी घेऊन बुडणार्या श्रावस्तीला काठावर आणले. तोपर्यंत सरला व स्मृती पाण्यात बुडाल्या होत्या. घटना लक्षात येताच काही लोकांनी धरण काठावर धाव घेतली; परंतु ते दोन्ही मायलेकींचे प्राण वाचवू शकले नाहीत. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार तांदळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मायलेकींचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
येळगाव धरणात विवाहितेची मुलीसह आत्महत्या
By admin | Published: April 02, 2015 1:57 AM