पुणे विद्यापीठ उजळणार सूर्यप्रकाशाने
By admin | Published: June 4, 2014 10:11 PM2014-06-04T22:11:39+5:302014-06-04T22:21:15+5:30
पुणे विद्यापीठाने आपल्या विविध प्रशासकीय इमारतींमध्ये पारंपरिक उर्जा स्त्रोतांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली वीज वापरली जावी,
सौर उर्जाचा वापर : लाखो रुपयांची होणार बचत
पुणे : पुणे विद्यापीठाने आपल्या विविध प्रशासकीय इमारतींमध्ये पारंपरिक उर्जा स्त्रोतांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली वीज वापरली जावी, या दिशेने पाऊल टाकण्यास विद्यापीठाने सुरूवात केली असून सौर उर्जा निर्मिती करणार्या एस. स्ट्रॉनिक कंपनीशी करारही केला आहे. परिणामी लवकरच विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीवर सौर उर्जा निर्मिती करणारी उपकरणे बसविली जाणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या इमारती एमएससीबीच्या प्रकाशाने नाही तर सूर्यप्रकाशाने उजळून निघणार आहेत.
विद्यापीठाला दर महिन्याला एमएससीबीचे एक कोटी रुपये वीज बील भरावे लागले. परिणामी विद्यापीठाला वीज बिलासाठी एका वर्षाला १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येतो. मात्र, विद्यापीठाने एस.स्ट्रॉनिक कंपनीशी करार केल्यामुळे पुढील काळात विद्यापीठाची वीज बिलाची रक्कम कमी होणार आहे.
विद्यापीठात उभारल्या जाणार्या सौर उर्जा लघु प्रकल्पाची माहिती देताना कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे म्हणाले, विद्यापीठाच्या बीसीयूडी, व प्रशासकीय इमारतीवर उभारल्या जाणार्या सौर उर्जा प्रकल्पाचा सर्व खर्च एस. स्टॉनिक कंपनी करणार आहे. विद्यापीठाने या कंपनीशी २० वर्षांचा करार केला आहे. विद्यापीठ सध्या ज्या दराने वीज बिलाचा भरणा करत आहे. त्यापेक्षा केवळ एक रुपये अधिक रक्कम या कंपनीकडून वापरल्या जाणार्या विजेच्या मोबदल्यात विद्यापीठातर्फे पुढील पाच वर्षे दिली जाणार आहे. एमएससीबीचे विजेचे दर वाढले तरी पुढील पाच वर्षे एस. स्टॉनिक कंपनीतर्फे विजेचे दर वाढविले जाणार नाहीत. त्यामुळे विद्यापीठाचा वीजेचा खर्च कमी होणार आहे.
पुणे विद्यापीठ व थरमॉक्स कंपनीतर्फे केंद्र शासनाला एक प्रस्ताव सादर केला जाणार असून त्या अंतर्गत ५० ते ६० कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून तळेगाव जवळील शिवे या लहानशा खेडे गावात कचरा व सौर उर्जा या दोन्ही पासून उर्जा निर्मिती करणारे प्रकल्प उभा केला जाणार आहे. तसेच प्रकल्पातून तयार होणारी वीज या गावाला उपलब्ध करून दिली जाणार आहे, असेही विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले.