महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारवर सुप्रिया सुळे ट्विट करत म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 11:10 AM2019-11-28T11:10:23+5:302019-11-28T11:15:32+5:30
विधानसभा निवडणुकीनंतर साधारणतः महिनाभर राज्यात सत्तासंघर्ष सुरू होता.
मुंबईः विधानसभा निवडणुकीनंतर साधारणतः महिनाभर राज्यात सत्तासंघर्ष सुरू होता. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज सायंकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपदासंदर्भात चढाओढ सुरू आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनीही या आघाडी सरकारसंदर्भात ट्विट करत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट करत त्या म्हणाल्या, आजचा सूर्योदय एका नवा इतिहास रचतोय. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात येत आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतिपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करू.
उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, या ऐतिहासिक सोहळ्यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व एच. डी. देवेगौडा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पंजाबचे कॅप्टन अमरेंद्र सिंग, भूपेश बघेल (छत्तीसगड), व्ही. नारायणस्वामी (पुड्डूचेरी), ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल) तसेच चंद्राबाबू नायडू, मुलायमसिंग यादव, अखिलेश यादव आदी नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.आजचा सूर्योदय एका नवा इतिहास रचतोय.महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात येत आहे.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करु.अभिनंदन -@OfficeofUT
— Supriya Sule (@supriya_sule) November 28, 2019
या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यातील 400 शेतकऱ्यांना विशेष निमंत्रित केले आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनाही आमंत्रित करण्यात आल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे सांगली जिल्ह्याच्या दौ-यावर असताना एका शेतक-याने मला तुमच्या शपथविधीला बोलवा, अशी विनंती केली होती. त्या शेतक-यास आवर्जून निमंत्रण पाठवले आहे. त्यामुळे हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक बनण्याची शक्यता आहे.