लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीतील फेरमतमोजणीत अभिनेता गटात सुशांत शेलार विजयी झाले. त्यांनी माजी अध्यक्ष विजय पाटकर यांचा १६ मतांनी पराभव केला. शेलार यांना ५९१ मते, तर विजय पाटकर यांना ५७३ मते पडली. या निर्णयाकडे सर्व चित्रपट व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाने सोमवारी फेरमतमोजणी घेण्यात आली.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची एप्रिल २०१६ मध्ये निवडणूक झाली होती. त्यामध्ये मेघराज राजेभोसले, सतीश रणदिवे यांच्या समर्थ पॅनेलने १४ पैकी १२ जागांवर विजय मिळविला होता. अभिनेता गटामध्ये विजय पाटकर १८ मतांनी विजयी झाले होते. यावेळी मतमोजणी प्रक्रियेबद्दल अभिनेते शेलार यांनी हरकत घेत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे फेरमतमोजणीची मागणी केली होती; पण ती मागणी कार्यालयाने फेटाळून लावल्याने शेलार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.पराभव झाल्याने पाटकर यांचे संचालकपद रद्द झाले आहे. उच्च न्यायालयाकडून फेरमतमोजणी निकालाची प्रत अथवा अहवाल प्राप्त झाल्यावर महामंडळाकडून शेलार यांच्या विजयाची घोषणा करण्यात येणार आहे.अडीच वर्षांपासून न्यायासाठी मी लढत होतो आज तो मिळाला. उरलेल्या पावणेतीन वर्षांत सभासदांच्या भल्याचे निर्णय कसे घेता येतील, यावर अधिक भर असेल.- सुशांत शेलार, अभिनेतेफेरमतमोजणीत माझा पराभव झाला असला तरी तो मला मान्य आहे. पुढील काळातही संचालक मंडळाच्या चांगल्या निर्णयाच्या मागे सदैव राहीन.- विजय पाटकर, अभिनेते
फेरमतमोजणीत १६ मतांनी सुशांत शेलार विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 5:41 AM