जालना - येथील व्यावसायिक नितीन कटारिया यांची हत्या प्रकरणातील संशयित सुभाष वैद्य यास जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटकमधून ताब्यात घेतले. बुधवारी रात्री त्याला जालन्यात आणण्यात आले. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यास पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
आज दुपारनंतर त्यास न्यायाल्यासमोर हजर केले जाणार आहे. कटारिया यांची मागील महिन्यात भरदिवसा (19 सप्टेंबरला) हत्या झाली होती. तेव्हापासून संशयित सुभाष वैद्य फरार होता. त्याबाबत माहिती देणाऱ्यास पोलिसांनी 25 हजार रुपयांच बक्षीस जाहीर केले होते.
शहरातील व्यावसायिक नितीन कटारिया यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी यासह अन्य मागण्यांसाठी जालना शहरात मूक मोर्चाही काढण्यात आला होता. शहरातील सकल मारवाडी समाजबांधवांसह व्यापा-यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.