मुंबई : एकीकडे स्वाइन फ्लूची साथ बळावत असताना दुसरीकडे मुंबईसह परिसरातील तब्बल ६५० फॅमिली फिजिशियन्सचा दोन दिवसीय मेळावा मुंबईत भरला होता. या वार्षिक संमेलनात मुंबईसह परिसरातील फॅमिली फिजिशियन्सची उपस्थिती होती. स्वाइन फ्लूच्या रुग्णांना सुरुवातीच्या काळात उपचारांची सर्वाधिक गरज असते. पण या साथीच्या आजाराने हातपाय पसरले असताना फॅमिली फिजिशियन्स मात्र वार्षिक संमेलनात रंगून गेले होते.सर्दी, खोकला, घसा खवखवणे, ताप ही प्राथमिक लक्षणे दिसू लागल्यानंतर पहिल्यांदा फॅमिली फिजिशियन्सकडे लोक धाव घेतात. स्वाइन फ्लूचीदेखील हीच लक्षणे असल्यामुळे सध्या लोक धास्तावलेले आहेत. त्यात शनिवारचा अर्धा दिवस आणि रविवारी साधारणपणे सगळीच क्लिनिक्स बंद असतात. त्यामुळे किमान सध्याच्या वातावरणात फॅमिली फिजिशियन्सचे हे संमेलन पुढे ढकलता आले असते. पण तसे न करता हे संमेलन घेण्यात आले. या संमेलनात सध्याच्या आजारांचीही माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मरिन लाइन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात हे संमेलन झाले. संमेलनाला पहिल्या दिवशी ४५० तर दुसऱ्या दिवशी ६५० फॅमिली फिजिशियन्सची उपस्थिती होती. टीबीचा धोका सध्या वाढत आहे. एमडीआर, एक्सडीआर टीबी कसा होतो? तो रोखण्यासाठी काय करता येईल? किडनीविषयक आजार, त्यांना आळा घालण्यासाठी काय करावे? यांसह अन्य आजारांपासून बचावासाठी रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी ही माहितीही उपस्थितांना देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
ऐन स्वाइनच्या साथीत डॉक्टरांचा भरला मेळावा
By admin | Published: March 02, 2015 2:28 AM