जालना - MNS on Manoj Jarange Patil ( Marathi News ) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. १० तारखेला सुरु झालेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्यात राज्यात सध्या राजकारणात बऱ्याच उलथापालथी आणि राज्यसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. यात मनसेने राज्य सरकारला टोला लगावला आहे. सरकारनं फोडाफोडीच्या राजकारणातून उसंत घ्यावी आणि जरांगेंच्या तब्येतीकडे लक्ष द्या अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
राजू पाटील यांनी ट्विट करून म्हटलंय की, मनोज जरांगेंची तब्येत ढासळत चालली आहे, अशावेळी सरकारने फोडाफोडीच्या राजकारणातून थोडी उसंत घेऊन सर्वप्रथम जरांगेच्या तब्येतीची दखल घेणे गरजेचे आहे. कोण चूक व कोण बरोबर हे येणारा काळ ठरवेल परंतु सरकारने कोणाच्याही जीवाशी खेळू नये असं ठाम मत व्यक्त केले आहे. पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना ट्विट करून ही मागणी केली आहे. आमदार राजू पाटील यांनी लोकमत वृत्तपत्राने छापलेल्या बातमीतील फोटोही ट्विटला जोडलेला आहे.
जालनाच्या अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या प्रकृती ढासळताना पाहून उपस्थित ग्रामस्थ, महिला आणि लहान मुलांनीही त्यांना निदान पाणी तरी प्या अशी गळ घातली आहे. जरांगे-पाटील यांनी उपचार घेण्यासही नकार दिला. त्यांनी किमान पाणी तरी प्यावे, यासाठी महिलांसह ग्रामस्थांनीही विनवणी केली. परंतु, जरांगे त्यांनाही नकार दिला. विशेष म्हणजे, उपोषण स्थळाशेजारी राहणारी दीड वर्षीय काव्या या चिमुकलीनेही एक तास जरांगे-पाटील यांच्याजवळ बसून मनोजमामा, पाणी घ्या अशी विनवणी केली.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची तब्बेत अतिशय खालावल्याने राज्यातील मराठा समाज चिंतेत आहे. आम्ही सर्वच नाही तर संपूर्ण समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे व आपल्या विषयी समाजाच्या मनात कसली ही शंका नाही. यात चिंतेतून समाजातील विविध संघटनांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. आपणा शिवाय आम्हास कुणी वाली नाही, आरक्षणाची लढाई सुरूच राहिल, आपण औषधोपचार घ्यावेत असे आवाहन मराठा मेडीकोज, महाराष्ट्र राज्यने पत्राद्वारे केले आहे.