नाशिक/पुणे/सांगली - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ राज्यभरात बुधवारी सन्मान मोर्चे काढण्यात आले होते. कोरेगाव-भीमा हिंसाचार सहभागाचा ठपका ठेवत संभाजी भिडेगुरुजी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, संभाजी भिडे यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही, असा दावा करत त्यांच्या समर्थकांनी राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले होते. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संभाजी भिडेंवर दाखल असलेले गुन्हे खोटे असून, ते मागे घ्यावेत, अशा घोषणा देत धारकरी रस्त्यावर उतरले होते.
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या या होत्या मागण्या 1. संभाजी भिडेंवरील खोटे गुन्हे सरकारने तत्काळ मागे घ्यावेत.2. मिलिंद एकबोटे, धनंजय देसाई यांची खोट्या आरोपातून मुक्तता करावी.3. पुण्यातील एल्गार परिषदेतील सर्व जातीयवादी वक्त्यांवर कारवाई करावी 4. कोरेगाव-भीमा हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगळेला न्याय मिळावा.5. 3 जानेवारी 2018 ला करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंददरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई बंद पुकारणाऱ्यांकडूनच करावी.6. हिंसाचारामागे नक्षली हात आहे का?, यावर चौकशी समिती नेमावी