आरोग्याची काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:55 AM2017-07-24T06:55:20+5:302017-07-24T06:55:20+5:30
वाढता पावसाचा जोर मुंबईत अनेक साथीचे आजार घेऊन येत आहे. दिवसागणिक मुंबई शहर-उपनगरांत साथीच्या आजारांचा आलेख चढताच असल्याचे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाढता पावसाचा जोर मुंबईत अनेक साथीचे आजार घेऊन येत आहे. दिवसागणिक मुंबई शहर-उपनगरांत साथीच्या आजारांचा आलेख चढताच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वेळोवेळी प्रशासनातर्फे मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. स्वाइन फ्लूसह गॅस्ट्रो, डेंग्यू आणि लॅप्टोचा विळखा वाढल्याने आरोग्याच्या तक्रारी असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यंदा स्वाइन फ्लूमुळे जानेवारी ते जुलै दरम्यान मुंबईत २२ जणांचा बळी गेला असून, ६७२ स्वाइन फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे फक्त जुलै महिन्यातच २५० रुग्णांची नोंद पालिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयांत करण्यात आली आहे. यातील ५ मृत्यू जुलैच्या पंधरवड्यात झाले आहेत.
गेल्या महिन्याभरात मुंबईत स्वाइन फ्लूचा प्रभाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचे नवे संकट मुंबईकरांसमोर उभे राहिले आहे. पावसामुळे अनेक आजार आणि आरोग्यांच्या समस्या निर्माण होतात. सकाळच्या वातावरणात थंडावा, तर दुपारी पाऊस असतो. दोन्ही वेळेत वातावरणात खूपच तफावत असल्याने साथीचे आजार वाढत आहेत. मानखुर्द परिसरात यंदाच्या वर्षी कॉलराचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत डेंग्यूच्या १२५ संशयित रुग्णांची नोंद झाली असून, या रुग्णांवर महापालिकेच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर यंदा २ जणांचा लॅप्टोमुळे बळी गेला आहे.
२ हजार २३० घरांचे सर्वेक्षण
स्वाइन-फ्लूच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, मुंबईत आतापर्यंत २२३० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणादरम्यान १८ जणांमध्ये या आजाराची प्राथमिक लक्षणे आढळून आल्याने त्यांना टॅमी-फ्लू हे औषध देण्यात आले आहे. आतापर्यंत, मुंबईतील झोपडपट्टी परिसरात ८६० घरांचे सर्वेक्षण करून ४८५0 कुटुंबांना लेप्टोसंदर्भात माहिती दिली जात आहे.
कोणत्याही तापाकडे दुर्लक्ष करू नका
सध्या वातावरणीय बदल लक्षात घेऊन सामान्य मुंबईकरांनी काळजी घेतली पाहिजे. त्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी घरचे अन्न घेतले पाहिजे. बाहेरचे अन्न टाळले पाहिजे. पाणीसुद्धा गरम करुन प्यावे. तसेच, कोणत्याही तापाकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. विशेष करुन लहान मुलांच्या प्रकृतीकडेही बारकाईने पाहिले पाहिजे.
- डॉ. मिनी खेत्रपाल, साथ रोग कक्ष नियंत्रण प्रमुख