Mahayuti Maharashtra News : विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या महायुतीच्या सत्ता स्थापनेचं घोडं नेमकं कुठे अडलंय, याबद्दल राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्यानंतर नाव जाहीर होईल असे बोलले जात होते. पण, अद्यापही नाव जाहीर झालेलं नाही. त्यात आता एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांनी डोकं वर काढलं आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास तयार नसल्याचे, तसेच शिवसेनेला गृह खाते हवे असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना हवा मिळाली आहे. यावर शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे.
शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. दिल्लीत झालेल्या बैठकीबद्दल विचारण्यात आले. सामंत म्हणाले, "याबाबतील माहिती एकनाथ शिंदेंनी प्रसार माध्यमांना दिली आहे. अतिशय सकारात्मक चर्चा झाली आहे. एकनाथ शिंदेंची भूमिका सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा एकदा एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होईल आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन होण्याचा निर्णय होईल."
शिंदेंचा फोटो, उदय सामंत म्हणाले...
एकनाथ शिंदे यांचा अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. शिंदे नाराज असल्याची चर्चा होत आहे, असेही सामंत यांना विचारण्यात आले.
"मला हल्ली लॉजिकचं कळेना झालंय की, एखादा फोटो बघून एकनाथ शिंदे नाराज आहेत. अजित पवारांचा फोटो बघून नक्की त्यांच्या मनात काय चाललं आहे. हे सगळं माध्यमांकडे कसं पोहोचतं हे फारच मोठं गूढ आहे. मला असं वाटतं की, एकनाथ शिंदे अमित शाहांना भेटले, त्यावेळी सकारात्मक वातावरण होतं. चेहऱ्यावर नाराजी नाही. एकनाथ शिंदे रात्री दीड वाजता माध्यमांशी बोलले, त्यांनीही सांगितलं की, सकारात्मक चर्चा झाली."
महायुतीची बैठक रद्द
मुंबईत महायुतीची बैठक होणार होती. ती रद्द झाली. त्याबद्दल उदय सामंत म्हणाले, "बैठक होणार आहे. नाही होणार, याबद्दल केंद्रीय नेतृत्व आणि आमचे तिन्ही नेते ठरवणार आहेत. त्यामुळे बैठक होणार की नाही, अशी शंका व्यक्त करण्यापेक्षा आपल्याला निर्णय अपेक्षित आहे. तो निर्णय लवकरात लवकर होईल."