जेटली-ठाकरे भेटीत जीएसटीसंबंधी चर्चा
By admin | Published: May 10, 2015 12:34 AM2015-05-10T00:34:07+5:302015-05-10T00:34:07+5:30
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी सायंकाळी मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी सायंकाळी मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली. केंद्रातील सरकारने गुडस अँड सर्व्हीस टॅक्स (जीएसटी) लागू केला तर मुंबई महापालिकेचा आर्थिक कणा असलेल्या जकातीचे उत्पन्न बंद होणार असून शिवसेनेचा त्याला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेला याबाबतच्या विधेयकाची माहिती देण्याकरिता जेटली यांनी ही भेट घेतल्याचे समजते.
देशभर जीएसटी लागू करण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी मिळवण्याचे दिव्य सरकारला पार पाडायचे आहे. जीएसटी विधेयकाला राज्यसभेत पाठिंबा हवा असेल तर कॅगने पूर्तीबाबत ठपका ठेवलेल्या केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यावर कारवाई करावी, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच केंद्र सरकारच्या अनेक प्रस्तावांना विरोध करणाऱ्या शिवसेनेला जीएसटी लागू झाल्यावर महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी १० ते १५ हजार कोटी रुपयांची जी जकात वसुली होते त्याचे काय होणार, याची चिंता उद्धव ठाकरे यांना वाटते. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा कडवा विरोध आहे. त्याच धर्तीवर जीएसटीला विरोध केला तर केंद्र सरकारपुढील संकट अधिक गहिरे होईल त्यामुळे जेटली यांनी मुंबई भेटीत आवर्जून मातोश्रीवर पायधूळ झाडल्याचे समजते. (विशेष प्रतिनिधी)