राजकारणात कुठलाही वाद सुरू झाला की, आ. जितेंद्र आव्हाड त्यामध्ये पहिली उडी घेतात. सध्या राज्यात ढेरीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. लागलीच आव्हाड यांनी सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो टाकून मिश्किल टिप्पणी केली. अर्थात तत्पूर्वी अजित पवार यांनी आव्हाड यांच्या पावसात भिजलेल्या फोटोचा जाहीर सभेत उल्लेख करून ढेरी सुटल्याची टिप्पणी केली होती. त्याला आव्हाड यांनी पवार यांचा फोटो पोस्ट करून उत्तर दिले.
आव्हाडांच्या पोटाच्या घेराचे माप काढताना अजित पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या फिटनेसचे कौतुक केले होते. नागपूरमध्ये सध्या अजित पवार, आव्हाड आणि महाजन हे तिघेही आहेत. शनिवार, रविवार अधिवेशनाला सुटी असते. त्या दिवशी पवार-आव्हाड यांनी महाजन यांच्याकडून त्यांचा फिटनेस फंडा जाणून घ्यावा, अशी कुजबुज सुरू आहे.
बुद्धी आणि शक्तीचा खेळ
धर्मवीर आनंद दिघे क्रीडानगरीत प्रशांत जाधव फाउंडेशन आणि विठ्ठल क्रीडा मंडळाने मंगळवारी आयोजित केलेल्या कुमार गटाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली.
कबड्डीपटूंना पारितोषिक देण्यास आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी उपस्थित राहिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कबड्डी खेळाबद्दल कौतुकोद्गार काढले. ते म्हणाले की, कबड्डी हा मराठी मातीतला हा खेळ आहे. उपस्थित कबड्डीपटूंनी एकच जल्लोष केला. कबड्डी हा बुद्धी आणि शक्तीचा खेळ आहे. राजकारणातदेखील बुद्धी आणि शक्तीचा खेळ करावा लागतो आणि हे दीड वर्षांपूर्वी महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाने पाहिले आहे. तिथूनच सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आपण स्थापन केले. शिंदे यांच्या या वक्तव्याला साहजिकच कबड्डीपटूंनी दाद दिली.