‘लक्ष्य २०१७’ मुळे मंडळांना अच्छे दिन
By admin | Published: September 10, 2016 01:36 AM2016-09-10T01:36:43+5:302016-09-10T01:36:43+5:30
अनेक इच्छुकांनी व आजी-माजी नगरसेवकांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना खूष ठेवण्यासाठी मोठ-मोठ्या रकमेच्या वर्गणीच्या पावत्या फाडल्या
नेहरुनगर : अनेक इच्छुकांनी व आजी-माजी नगरसेवकांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना खूष ठेवण्यासाठी मोठ-मोठ्या रकमेच्या वर्गणीच्या पावत्या फाडल्या असल्यामुळे यंदाच्या वर्षी गणेश मंडळांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी ‘लक्ष्य २०१७’साठी मोर्चेबांधणी केली आहे. श्रीमंत महापालिकेत विश्वस्त बनण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रभागात अनेक सामाजिक उपक्रम घेऊन नागरिकांमध्ये ‘चमकोगिरी’ करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अनेक गणेश मंडळांचे कार्यकर्ते उमेदवार पाहून वर्गणीचा आकडा कमी जास्त करीत आहेत. अनेक कार्यकर्ते प्रभागातील निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या व परिसरातील आजी-माजी नगरसेवकांकडून हजारांपासून लाखो रुपयापर्यन्तच्या मोठमोठ्या आकड्याचा वर्गणीच्या पावत्या फाडल्या जात आहेत.
याचबरोबर गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोठी वर्गणी देणाऱ्या इच्छुकांना मंडळाचे आधारस्तंभ, मार्गदर्शक, संयोजक, युवा नेते,भावी नगरसेवक, आपला लोकसेवक, जनसेवक, सामाजिक कार्यकर्ता, युवा कार्यकर्ता, दादा, नाना, भाऊ अशा विविध प्रकारच्या पदव्या त्यांच्या छायाचित्रासह मंडळाच्या वार्षिक अहवालामध्ये प्रसिद्ध करत आहेत.
(वार्ताहर)
>सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर
अनेक मंडळांच्या अध्यक्षांनी विविध स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले असून त्यासाठी जास्तीत जास्त मतदार स्वत:च्या मंडळाकडे येतील याकडे लक्ष देण्यात आले आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची घोषणाच त्यातून केल्याची चर्चा परिसरामध्ये आहे.