साहित्यामध्ये ‘दहशतवाद’ निर्माण झालाय : रा. रं. बोराडे 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 02:28 PM2020-03-05T14:28:44+5:302020-03-05T14:29:00+5:30

साहित्य संमेलनात सहभागी होणे आणि पुरस्कार मिळविणे ही लेखकाची ऊर्जा नव्हे.

'Terrorism' has been created in the literature: R.R.Borade | साहित्यामध्ये ‘दहशतवाद’ निर्माण झालाय : रा. रं. बोराडे 

साहित्यामध्ये ‘दहशतवाद’ निर्माण झालाय : रा. रं. बोराडे 

googlenewsNext
ठळक मुद्देसंमेलनाची सूत्रं राजकारण्यांच्या हाती देऊ नयेत

पुणे : पूर्वीच्या काळात ग्रामीण साहित्यामध्ये जात कधी डोकवायची नाही. पण आज अमुक लेखक माझ्या जातीचा आहे. त्याच्याबद्दल चांगले बोलायचे तर बोला, नाहीतर गप्प बसा, अशी परिस्थिती आहे. लेखकांनाही समुहात सामील झाल्याशिवाय आपल्याला सुरक्षित वाटणार नाही, अशी भयानक अवस्था आहे. आज एक प्रकारची झुंडशाही सुरू झाली असून, साहित्यामध्येदहशतवाद’ निर्माण झाला आहे, अशा शब्दांत ग्रामीण साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी वास्तवावर बोट ठेवले. 
भारतीय विचार साधना प्रकाशन संस्थेच्या वतीने ‘विचारभारती साहित्य संवाद अंतर्गत’ लेखक वाचक संवादात्मक कार्यक्रमात ग्रामीण साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी दुसरे पुष्प गुंफले. यावेळी प्रसिद्ध गझलकार दीपक करंदीकर यांनी बोराडे यांचा परिचय करून दिला. भाविसाचे अध्यक्ष किशोर शशीतल, कार्याध्यक्ष डॉ. मुकुंद दातार उपस्थित होते.
आज जातीयवाद प्रत्येक क्षेत्रात आहे. राजकारणी तो वाद चिघळवत आहेत. साहित्यात दहशतवाद वाढत गेला तर लेखकांना आपण का लिहायचे, हा प्रश्न पडेल. जातीयवादाने समीक्षक मारला. आज समीक्षेच्या नावाखाली जे प्रसिद्ध होत आहे. त्यात केवळ पुस्तकाची मांडणी असते. मग शेवटी छोटा अभिप्राय नोंदविला जातो. यापुढील काळात जातीयवादाबद्दल सजग राहणे हे हितावह आहे, असा इशाराही बोराडे यांनी दिला. प्रत्येक लेखकाचा एक अवकाश असतो आणि तो त्याला गवसावा लागतो. लेखक हा जन्मावा लागतो हे अमान्य करता येत नाही पण त्याची जडणघडण कशी झाली हे महत्त्वपूर्ण आहे. माझ्या मनात कोणत्या दिशेने जावे, याविषयी संभ्रम होता. पण व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘गावाकडच्या गोष्टी’ कथेमुळे लेखनाला प्रेरणा मिळाली आणि ‘वसुली’ ही कथा लिहिली. पुण्याचा आधार मिळाला नसता तर लेखक म्हणून दिसलो नसतो, अशी भावनाही बोराडे यांनी व्यक्त केली. आजमितीला माझ्या  ‘पाचोळा’ कादंबरीची दहावी आवृत्ती निघत आहे. या बोली भाषेतील कादंबरीला वाचकांनी डोक्यावर घेतले. साहित्य संमेलनात सहभागी होणे आणि पुरस्कार मिळविणे ही लेखकाची ऊर्जा नव्हे. ‘वाचक’ हाच लेखकाचा सर्वोच्च पुरस्कार असतो, असा सल्ला त्यांनी नवोदित कलाकारांना दिला. 
कोणत्याही चळवळीत स्वत:चे अस्तित्व विसरून एकरूप व्हायचे असते. आम्हाला आमचे अस्तित्व ग्रामीण साहित्य चळवळीत विरघळून टाकता आले नाही, म्हणून ही चळवळ अयशस्वी झाली असल्याची कबुलीही त्यांनी दिली.
  किशोर शशीतल यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मुकुंद दातार यांनीही विचार व्यक्त केले. राजन ढवळीकर यांनी आभार मानले.
............
संमेलनाची सूत्रं राजकारण्यांच्या हाती देऊ नयेत
साहित्य संमेलनाची सूत्र राजकारण्यांच्या हातात देऊ नयेत. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी विराजमान झाल्यावर त्या व्यक्ती आपला गोतावळा निर्माण करतात. 

त्यामुळे राजकारण्यांनी जोडे व्यासपीठाबाहेर ठेवावेत आणि रसिक म्हणून सहभागी व्हावे. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ साहित्यिकांचेच असले पाहिजे, असे परखडपणे बोराडे यांनी आपले मत नोंदविले.

Web Title: 'Terrorism' has been created in the literature: R.R.Borade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.