दुष्काळ मदतनिधीकडे साखर कारखान्यांची पाठ
By admin | Published: May 3, 2016 02:18 AM2016-05-03T02:18:35+5:302016-05-03T02:18:35+5:30
दुष्काळ मतदनिधी म्हणून राज्यातील साखर कारखान्यांनी प्रत्येकी १० लाखांचा निधी द्यावा, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाहनाला कारखान्यांकडून थंड प्रतिसाद
पुणे : दुष्काळ मतदनिधी म्हणून राज्यातील साखर कारखान्यांनी प्रत्येकी १० लाखांचा निधी द्यावा, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाहनाला कारखान्यांकडून थंड प्रतिसाद मिळाल्याचे उघड झाले आहे. ११ दिवस उलटून गेल्यानंतर १७७ पैकी केवळ ६ कारखान्यांनीच प्रत्यक्षात मदत दिली आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये २१ एप्रिल रोजी पार पडलेल्या सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे अध्यक्ष व संचालकांच्या बैठकीत पवार यांनी हे आवाहन केले होते. परंतु बारामती अॅग्रो साखर, शिरूरमधील व्यंकटेश कृपा, कागलमधील छत्रपती शाहू, पुण्यातील दौंड शुगर, कोल्हापूरमधील दत्त शिरोळ आणि दूधगंगा-वैधगंगा या सहा कारखान्यांनी साखर आयुक्त कार्यालयात मदतीचे धनादेश जमा केले आहेत.
कारखान्यांनी १० लाखांची मदत केल्यानंतर लेखा परीक्षण करताना त्यावर आक्षेप घेऊ नयेत, म्हणून राज्य शासनाने तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी या वेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह कारखान्यांच्या प्रतिनिधींनी केली होती. त्यावर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने परिपत्रक काढण्याचे जाहीर केले होते. (प्रतिनिधी)