विशेष प्रतिनिधी नागपूर : नियोजनबद्ध विकास आणि नागरिकांना चांगल्या सोईसुविधा पुरविण्यासाठी मुंबई महापालिकेचे त्रिभाजन करून तीन महापालिका कराव्यात, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नसीम खान यांनी करताच, आज विधानसभेत एकच गदारोळ झाला. भाजपा-शिवसेना व काँग्रेसचे सदस्य आमनेसामने आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.मुंबईत दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीसंदर्भात बोलताना नसीम खान यांनी नागरिकांना मूलभूत दर्जेदार सुविधा मिळत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करत, मुंबई महापालिकेच्या त्रिभाजनाची मागणीकेली. यावर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी, मुंबईचे तुकडे पाडण्याचा हा डाव असून, तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असे सांगितले.मुंबई महापालिकेचे विभाजन आपल्याला मान्य नसल्याचे सांगत, त्यांनी नसीम खान यांची विधाने कामकाजातून काढण्याची मागणी केली.त्यानंतर गदारोळ सुरू झाला. भाजपाचे सदस्य वेलमध्ये उतरले. या गोंधळात राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी, मुंबई महाराष्ट्रातच राहणार आहे, तिचे तुकडे करण्याचे कुणीही म्हटलेले नाही. मात्र, काही जण कारण नसतानावेगळा संदेश समाजात जावा, असा प्रयत्न करीत असल्याचे सांगत, शेलार यांच्यावर निशाणा साधला.पुणे महापालिकेचे विभाजन करावे, अशी मागणी समोर आलेली होती. ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका आहेत. मुंबईत तीन महापालिका असाव्यात का, हा चर्चेचा भाग आहे, असे सांगत, त्यांनी नसीम खान यांचा बचावदेखील केला. मुंबईचे तुकडे पाडण्याची कोणतीही भाषा आपण केलेली नाही. केवळ प्रशासकीय व्यवस्था, विकास कामांना गती मिळण्यासाठी दिल्लीच्या धर्तीवर तीन महापालिका असाव्यात, असे मत व्यक्त केलेले होते, असे नसीम खान यांनी स्पष्ट केले.नसीम खान यांचे मत कामकाजातून काढणार नाही-नसीम खान यांनी त्यांचे मत मांडलेले आहे. ते कामकाजातून काढले जाणार नाही, असे स्पष्ट करून, अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शेलार यांच्या मागणीतील हवा काढली. गदारोळात कामकाज एकदा १० मिनिटांसाठी, तर दुसºयांदा अर्ध्या तासासाठी स्थगित झाले, नंतर कामकाज सुरळीत झाले.शिवसेनेचे सुनील प्रभूयांनी मुंबईचे त्रिभाजन शिवसेना कदापिही होऊ देणार नाही, असे सुनावले.शिवसेनेचे सुभाष साबणे यांनीही मुंबईला धक्काही लागता कामा नये, असे सांगत, नसीम खान यांना उद्देशून वादग्रस्त विधान केले. त्यामुळे गदारोळात भरच पडली.तिकडे ‘नसीम खान हाय हाय’, ‘मुंबई आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची’, अशा घोषणा भाजपा-शिवसेनेचे सदस्य देऊ लागले. काँग्रेसच्या सदस्यांनीही घोषणाबाजी सुरू केली.
मुंबई महापालिकेच्या त्रिभाजनावरून गदारोळ, भाजपा-शिवसेना व काँग्रेस सदस्य आमनेसामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 3:09 AM