Thackeray Group Vaishali Darekar News:महायुतीबाबत काही जागांवरून अद्यापही चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दहा जागांवर असलेला महायुतीचा तिढा आता दोन-तीन जागांवर आला आहे, असे सांगितले जात आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघासाठी श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील, असे जाहीर केले. यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडून या घोषणेचे स्वागत करण्यात आले आहे. तसेच श्रीकांत शिंदे यांच्या मोठ्या विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सांगली जागेवरून महाविकास आघाडीतील कुरबूर वाढल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सांगली दौऱ्यावर आहेत. जनतेला बदल हवा आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. तसेच ठाकरे गट आणि काँग्रेस या दोघांपैकी कुणीही सांगलीच्या जागेवरून माघार घेताना दिसत नाही. यातच श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीबाबत संजय राऊतांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले. ठाणे आणि कल्याणमध्ये लढत होणारच नाही. तिथे शिवसेनेचाच उमेदवार जिंकणार आहे. उद्धव ठाकरे यांचा उमेदवार ठाणे आणि कल्याण-डोंबिवली येथे विजयी होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला. यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभेसाठी वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे.
श्रीकांत शिंदेंना कल्याणची उमेदवारी; वैशाली दरेकरांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर वैशाली दरेकर यांनी याविषयी पहिली प्रतिक्रिया दिली. वैशाली दरेकर म्हणाल्या की, मला ऐकून आनंद झाला की, श्रीकांत शिंदे यांना कल्याणची उमेदवारी जाहीर झाली. परंतु, माझ्या मनात एक शंका आहे. ती म्हणजे श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांचे चिन्ह काय असेल? कमळ की धनुष्यबाण? कोणत्या चिन्हावर लढायचे हे त्यांनी ठरवले आहे का? याचसाठी सगळा अट्टाहास केला होता का? हीच नामुष्की ओढावली आहे की, त्यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. कार्यकर्ते काम करत असतात. त्यांना उमेदवारी जाहीर झाली म्हणून काही फरक पडणार नाही. काय करायचे, ते आता कार्यकर्ते ठरवतील, असे वैशाली दरेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजपाकडून विरोध नाही. श्रीकांत शिंदे कल्याणमधील शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. श्रीकांत शिंदे यांच्या पाठिशी भाजपा खंबीरपणे उभी राहणार आहे. पूर्ण ताकदीने आणि मागील वेळेपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून आम्ही सगळे मग त्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा ही महायुती त्यांना निवडून आणेल, हा विश्वास व्यक्त करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.