ठाणे-डोंबिवली पुन्हा १४ मिनिटांत
By admin | Published: May 30, 2016 02:17 AM2016-05-30T02:17:10+5:302016-05-30T02:17:10+5:30
ठाणे ते डोंबिवली हे अंतर जलद लोकलने कापण्यासाठी सध्या ३० मिनिटे लागत आहेत.
मुंबई : ठाणे ते डोंबिवली हे अंतर जलद लोकलने कापण्यासाठी सध्या ३० मिनिटे लागत आहेत. मात्र पुन्हा हे अंतर १४ मिनिटांतच कापता येणार आहे. परंतु, यासाठी प्रवाशांना एक आठवडा प्रतीक्षा करावी लागणार आहे. पारसिक बोगद्यातील रूळांखालील खडी बदलण्याचे काम एका आठवड्यात पूर्ण होणार आहे. तसेच पारसिक बोगद्यात असलेली ताशी ३० किमीची वेगमर्यादाही शिथिल करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.
डीसी-एसी परिवर्तन झाल्यापासून पारसिक बोगद्याजवळ ताशी ३० किमीची वेगमर्यादा लावण्यात आली आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आल्याने पारसिक बोगद्यात रूळांखालील खडी बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जलद लोकलच्या ‘धिम्या’ गतीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत.
पारसिक बोगद्यात सातत्याने पाणी झिरपत असल्याने रूळाखालील खडी ठिसूळ झाली आहे. खडी रुळांना आधार देण्याचे काम करते. त्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांना हादरे बसू नयेत, यासाठी मध्य रेल्वेने खडी बदलण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून एका आठवड्यात काम पूर्ण होईल व पुन्हा ठाणे ते डोंबिवली हे अंतर १४ ते १५ मिनिटांत कापणे
शक्य होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.