महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम आता २५ लाख, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 08:06 AM2023-02-01T08:06:37+5:302023-02-01T08:07:11+5:30
Maharashtra Bhushan award: महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच हा पुरस्कार नव्या स्वरूपात, आणखी दिमाखदार ठरावा, यासाठी प्रयत्न व्हावेत, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच पुरस्कार समितीचे सदस्य ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम, प्रा. शशिकला वंजारी, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत आदी दृक्श्राव्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
बैठकीत पुरस्काराच्या स्वरूपाबाबत तपशीलवार चर्चा झाली. पुरस्कारासाठी सुमारे २७ नावांचे प्रस्ताव सरकारकडे आले होते, त्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. बैठकीत काही सदस्यांनी नवीन नावेही सुचविली. त्यांचाही नव्याने विचार करण्याचे ठरले.
महाराष्ट्रात अनेक कर्तबगार व्यक्तिमत्त्व आहेत. अनेकांनी विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा या पुरस्कारासाठी विचार व्हावा. याकरिता सर्वंकष अशी नियमावली करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.