मुंबई – बिअरवरील उत्पादन शुल्कात दरवाढ केल्यानं गेल्या काही दिवसांपासून बिअरच्या विक्रीत घट झाली आहे. त्यामुळे राज्याला मिळणारा महसूलही कमी होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. बिअरवरील उत्पादन शुल्काचा दर इतर मद्यापेक्षा जास्त असल्याने बिअरची किंमत बघून ग्राहक बिअर पिण्याकडे आकृष्ट होत नाही. त्याचसोबत इतर राज्यांनी बिअरच्या उत्पादन शुल्काचा दर कमी केल्यानंतर त्या राज्यांना महसुलवाढीसाठी फायदा झाल्याचे शासनाला दिसून आले आहे.
बिअर उद्योगाच्या माध्यमातून राज्यात महसूल वाढावा यादृष्टीने शासनाने एक समिती नेमली आहे. ही समिती बिअर उद्योगातून राज्यात महसूल वाढ व्हावी यासाठी शिफारशी देतील. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे. अपर मुख्य सचिव(राज्य उत्पादन शुल्क), आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, उपसचिव, राज्य उत्पादन शुल्क, ऑल इंडिया ब्रुवरिज असोसिएशन प्रतिनिधी, अपर आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क ही ५ जणांची ही समिती असून अभ्यास करून ही समिती १ महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करेल.
त्याचसोबत समिती बिअरवरील मद्यार्क तीव्रतेनुसार तसेच मुल्याधारित पद्धतीनुसार आकारण्यात येणारा सध्याचे उत्पादन शुल्क, बिअरवरील यापूर्वीच्या उत्पादन शुल्क दरवाढी आणि त्याचा महसूल जमेवर होणारा परिणाम या सर्व गोष्टी लक्षात ठेऊन शासन महसुलात वाढ होण्याच्या दृष्टीने काय सुधारणा कराव्या लागतील यासाठी अभ्यास करेल. इतर राज्यांतील बिअर धोरणाची वस्तूदर्शक माहितीही समिती गोळा करणार आहे. शासनाने या समितीच्या नेमणुकीचा जीआर काढला आहे. मात्र विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावरून टीकास्त्र सोडले आहे.
“पिओ बिअर..! करो सरकार को चिअर”
महाराष्ट्रात बिअरची कमी विक्री का होते याचा अभ्यास करून महाराष्ट्रात बिअर विक्री वाढवण्यासाठी काय करता येईल यासाठी महाराष्ट्र सरकारने पाच IAS अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. या समितीमध्ये बिअर असोसिएशनच्या एका प्रतिनिधींचाही समावेश केला आहे. मराठी शाळा वाचवल्या पाहिजेत यासाठी यांना समिती गठित करण्याची आवश्यकता भासू नये हेच महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. रेशनवर बिअर वाटली तर घरोघरी दारू पिणारे तयार होतील. आमच्या साधू संतांनी केलेल्या प्रबोधनावर, गाडगे बाबांनी केलेल्या व्यसनमुक्ती प्रबोधनावर सरकार बिअर ओतणार वाटतं. जनता आंधळी कोशिंबीर खेळण्यात व्यस्त असल्याने सरकार बिनधास्त समाज विघातक निर्णय घेण्याची हिंमत करू लागले आहे अशी टीका राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.