तृतीयपंथीयांसाठी स्वच्छतागृह
By Admin | Published: September 10, 2016 01:43 AM2016-09-10T01:43:32+5:302016-09-10T01:43:32+5:30
लोकवस्त्यांतील सार्वजनिक स्वच्छतागृहांत महिला आणि पुरुष असेच वर्गीकरण केलेले असते.
मुंबई : लोकवस्त्यांतील सार्वजनिक स्वच्छतागृहांत महिला आणि पुरुष असेच वर्गीकरण केलेले असते. पण तृतीयपंथीयांसाठी वेगळे स्वच्छतागृह, शौचकूप नसल्याने त्यांना रात्री उशिरापर्यंत नैसर्गिक विधीसाठी थांबावे लागते. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही ही परिस्थिती बदललेली नाही. पण, मुंबईतील बैंगनवाडी परिसरात ‘एकता हिंद मंडळा’ने हा बदल घडवला आहे. या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहात पहिल्यांदाच तृतीयपंथीयांसाठी राखीव शौचकूप ठेवण्यात आले आहे.
महिला आणि पुरुषांप्रमाणेच सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये तृतीयपंथीयांसाठी विशेष व्यवस्था असायला हवी, असे निर्देश न्यायालयाने २०१५मध्ये दिले होते. तरीही तृतीयपंथीयांची वस्तीपातळीवर संख्या कमी असल्याने याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. काही दिवसांपूर्वीच ‘राईट टू पी’ची राष्ट्रीय परिषद मुंबईत पार पडली. या वेळी छत्तीसगड येथून आलेल्या तृतीयपंथीयांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची व्यथा मांडली होती. रात्री अंधार पडेपर्यंत आम्हाला थांबून राहावे लागते. कारण, महिलांच्या स्वच्छतागृहात गेल्यावर त्यांना ही गोष्ट आवडत नाही. तर, पुरुषांच्या स्वच्छतागृहात आम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे आमची कुचंबणा होते. या परिषदेत पुन्हा एकदा हा प्रश्न समोर आला होता.
मुंबईतील तृतीयपंथीयांनाही ही समस्या भेडसावते. त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. म्हणून पुढाकार घेऊन गोवंडीच्या बैंगनवाडी येथील दस्वच्छतागृहात तृतीयपंथीयांसाठी राखीव कूप ठेवण्यात आले आहे. महापालिकेच्या दत्तक वस्ती योजनेतून उभारलेले हे स्वच्छतागृह आहे. या स्वच्छतागृहात ‘तृतीयपंथीयांसाठी राखीव’ असा फलक दिसल्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. शहरातील तृतीयपंथीयांसाठीचे हे पहिले स्वच्छतागृह आहे. बैंगनवाडी, कुर्ला आणि देवनार परिसरात अनेक ठिकाणी तृतीयपंथीयांच्या वस्त्या आहेत. (प्रतिनिधी)