पुणे
राज्यसभा माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यासोबतच 'स्वराज्य' नावाच्या नव्या संघनटेचीही संभाजी राजे यांनी स्थापना केल्याचं जाहीर केलं. समाजाच्या हितासाठी आजवर काम करत आलो आहे आणि यापुढेही करत राहीन. मी पक्षहित कधी पाहिलेलं नाही मी जी गोष्ट समाजाच्या हिताची असेल त्या मुद्द्याना मी पाठिंबा देत आलो आहे. त्यामुळे आजवर मी दिलेलं योगदान पाहून याच व्यक्तीला आपण पुन्हा राज्यसभेवर का पाठवू शकत नाही, असा सर्व पक्षांनी विचार करावा आणि मी जसं त्यांना आजवर सहकार्य करत आलो आहे त्याचपद्धतीनं त्यांनी मला सहकार्य करुन राज्यसभेवर पाठवावं, असं आवाहन संभाजी राजे यांनी यावेळी केलं.
संभाजीराजेंकडून 'स्वराज्य' संघटनेची स्थापना, राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार!
राज्यसभेच्या सहा जागा जुलै महिन्यात रिक्त होत आहेत आणि आपण आता कोणत्याही पक्षाचे सदस्य राहिलेला नाहीत. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षानं पाठिंबा दिला नाही. मग पुढे काय करणार? असं संभाजी राजे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी लोकसभेचंही सुतोवाच केलं. "मी राज्यसभाच काय तर लोकसभा देखील लढवू शकतो. तेही मी राज्यात कोणत्याही मतदार संघातून मी लोकसभा लढवू शकतो. राज्यात असे फारच कमी नेते आहेत की जे कोणत्याही मतदार संघात उभे राहिले तर निवडून येऊ शकतात. त्यातील मी एक आहे", असा विश्वास संभाजी राजे यांनी यावेळी व्यक्त केला.
संभाजीराजेंनी भाजपाची साथ सोडली; असे मांडले राज्यसभेच्या मतांचे गणित
"महाराष्ट्राच्या जनतेनं छत्रपती घराण्यावर आजवर खूप प्रेम केलं आहे आणि त्यासाठी मी त्यांचे खरंच खूप आभार मानतो. समाजकल्याणासाठी मी काम करू शकलो. २००७ पासून ते आतापर्यंत मी समाजकार्याला वाहून घेतलंय आणि यापुढेही समाजासाठीच काम करण्याची माझी इच्छा आहे", असं संभाजीराजे म्हणाले.
'स्वराज्य' संघटनेची स्थापना "लोकांना संघटीत करण्यासाठी, समाजाला एक वेगळी दिशा देण्यासाठी आणि गोरगरीबांचं कल्याण कऱण्यासाठी मी एक संघटना स्थापन करत आहे. या संघटनेचं नाव 'स्वराज्य' असं आहे. या महिन्यातच लोकांची भावना समजून घेण्यासाठी राज्याचा दौरा करणार आहे", असं संभाजी राजे म्हणाले. स्वराज्य संघटना ही राजकीय वाटलाचीही पहिली पायरी असणार असल्याचंही ते म्हणाले. पुढील महिन्यापासूनच राज्याचा दौरा करणार असून जनभावना जाणून घेणार असल्याचंही संभाजी राजे यांनी यावेळी सांगितलं.
भगवी रेष माझ्या हृदयातस्वराज्य संघटनेचं काही बोधचिन्ह वगैरे असणार आहे का? असं विचारण्यात आलं असता संभाजी राजे यांनी संघटनेचं कोणतंही चिन्ह, झेंडा किंवा रंग याबाबत मी अद्याप काहीच ठरवलेलं नाही. आधी मला जनतेत जाऊ द्या. त्यांची भावना समजून घेऊ द्यात. कोणी कोणतेही रंग दिले तरी भगवी रेष माझ्या हृदयात आहे, असं संभाजीराजे म्हणाले.