तर ‘त्या’ तंत्रनिकेतनचे अभ्यासक्रम बंद होणार; राज्याच्या तंत्रशिक्षण सचिवांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 06:24 PM2020-01-17T18:24:13+5:302020-01-17T18:24:25+5:30
३० टक्क्यांपेक्षा कमी प्रवेशाची अट लागू
अमरावती : राज्यात शासकीय तंत्रनिकेतमध्ये सलग तीन वर्षांपासून ३० टक्क््यांपेक्षा कमी प्रवेश असलेले अभ्यासक्रम बंद करण्याचे प्रस्ताव पाठवा, असे आदेश तंत्रशिक्षण सचिवांनी प्राचार्यांना दिले आहे. त्यामुळे शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रवेशाची तपासणी युद्धस्तरावर सुरू झाली आहे.
दहावीच्या पात्रतेवर अभियांत्रिकीचे पदविका शिक्षण देणारे शासकीय अथवा खासगी तंत्रनिकेतनमधील प्रवेशाबाबत गत चार ते पाच वर्षांपासून उदासीनता आहे. प्रवेशाअभावी अनेक तंत्रनिकेतन शेवटच्या घटका मोजत आहेत. प्रवेश नगण्य असले तरी अनेक अभ्यासक्रम सुरू ठेवले आहेत. अशा अभ्यासक्रमांची चाचपणी करण्याचे आदेश मिळाले आहे. त्याअनुषंगाने सर्वच विभागांतील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सन २०१७ ते २०२० या वर्षात विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश तपासले जात आहेत. ३० टक्क्यांपेक्षा प्रवेश कमी असल्यास शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांना हे अभ्यासक्रम बंद करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविणे अनिवार्य करण्यात आले आहे. कदाचित असे प्रस्ताव पाठविण्यास कुचराई केल्यास संबंधित तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांना कारवाईच्या सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट निर्देश राज्याचे तंत्र शिक्षण सचिव सौरभ विजय यांनी आदेशाद्वारे दिले आहे.
अचलपूर तंत्रनिकेतनच्या प्रवेशाला कात्री
अचलपूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मॅकेनिकल अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता १२० वरून ६० एवढी करण्यात आली आहे. गत तीन वर्षांपासून या अभ्यासक्रमासाठी प्रवेश रोडावल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे. अमरावती येथील मार्डी मार्गालगतच्या नव विद्यानिकेतन बंद करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
मूर्तिजापूर तंत्रनिकेतनचा ६० जागांचा नव्याने प्रस्ताव
मूर्तिजापूर येथील शासकीय तंत्रनिकेतनला स्थापत्य अभियांत्रिकी प्रवेशासाठी ६० जागांचा नव्याने प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. स्थापत्य अभियांत्रिकी प्रवेशाला मागणी वाढत असल्याने हा प्रस्ताव अमरावती येथील तंत्रशिक्षण उपसंचालकांमार्फत राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
उच्च व तंत्रशिक्षण सचिवांच्या आदेशानुसार शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांना गत तीन वर्षांपासून ज्या अभ्यासक्रमात प्रवेश ३० टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा तंत्रनिकेतनचा अहवाल पाठविण्याबाबत कळविले आहे.
- एम. ए. अली
सहायक संचालक, तंत्र शिक्षण, अमरावती.
राज्यात ४४ शासकीय तंत्रनिकेतन
राज्यात अमरावती विभागात सहा, नागपूर विभागात सात, पुणे विभागात नऊ, औरंगाबाद विभागात १०, मुंबई विभागात सात, नाशिक विभागात पाच शासकीय तंत्रनिकेतन आहेत.