"बाळासाहेबांचा शिवसैनिक अन् राज ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक यात काहीही फरक नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 05:32 PM2022-07-26T17:32:36+5:302022-07-26T17:33:38+5:30
राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार आहेत. बाळासाहेबांच्या अंगाखांद्यावर ते वाढले आहेत असं मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.
मुंबई - बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना जन्म दिला. पण आमच्यासारखे लाखो, करोडो कार्यकर्ते आहेत ज्यांना कर्माने बाळासाहेबांनी जन्म दिला. आमचा अधिकार त्यांच्याहून जास्त आहे. कर्माने बाळासाहेबांनी आम्हाला मोठे केले. बाळासाहेब एक विचार, एक संस्कार आणि आम्हाला पुढे घेऊन जाणारं मार्गदर्शक नेतृत्व होतं. बाळासाहेब संस्था आहे त्यावर आमचाही अधिकार असा टोला मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
बाळा नांदगावकर म्हणाले की, राज ठाकरे स्पष्ट आणि परखड बोलतात. त्यांच्या पोटात तेच ओठावर येते. राज ठाकरेंनी मुलाखतीत त्यांची भूमिका ठामपणे मांडली. राज यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे लोकांना त्यांच्या मनाचा ठाव घेता येतो. राज ठाकरेंनी केलेले विधान, पत्र, भूमिका नेहमी चर्चेत राहते. तुम्हाला काय हवं हे राज ठाकरेंना बरोबर माहिती आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच प्रत्येकाला आपापला अधिकार आहे. पक्ष पुढे कसा न्यायचा. आम्ही आमची भूमिका पुढे घेऊन चाललो आहोत. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार आहेत. बाळासाहेबांच्या अंगाखांद्यावर ते वाढले आहेत. बाळासाहेबांची सगळी भूमिका राज ठाकरेंना माहिती आहे. हे सरकार बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जाईल अशी अपेक्षा आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार बाळासाहेबांच्या विचाराने चालेल ही खात्री आहे असंही बाळा नांदगावकर म्हणाले. दरम्यान, मी बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे आणि तोच विचार राज ठाकरे महाराष्ट्र सैनिकांना देत आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आणि राज ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक यांच्यात काहीही फरक दिसत नाही असंही बाळा नांदगावकरांनी म्हटलं.
बाळासाहेब कुणा एकाची मक्तेदारी नाही
छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दैवत मानतो जर त्यांच्या कुटुंबाने सांगितले महाराजांचे फोटो लावू नका, आंबेडकरांचे फोटो लावू नका. मग त्या त्या महापुरुषाला तुम्ही लहान करत नाही का? हे उद्धव ठाकरेंना कळालं नाही. बाळासाहेब कुणा एकाची मक्तेदारी नाही. स्मारक का बांधताय? ज्योत का पेटवली आहे? राज्यातील जनता तिथे नतमस्तक होते. शिवसेनाप्रमुखांना किती लहान करणार आहात? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना विचारला.